नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणार्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे बॅडमिंटनपटू अधिक पदकांची कमाई करतील असा विश्वास बॅडमिंटनचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे.
पुढील महिन्यात 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे ही स्पर्धा रंगणार आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेली सायना नेहवाल आणि तिसर्या स्थानी असलेला किदम्बी श्रीकांत या स्पर्धेत सहभागी होत असल्याने भारताला अधिक पदके मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताचे पारुपल्ली कश्यप, श्रीकांत, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय चांगला खेळ करत आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतही या बॅडमिंटनपटूंनी चांगला खेळ केल्यास भारताला अधिक पदके मिळण्याची संधी असल्याचे गोपीचंद म्हणाले.