मुंबई : डोंबिवलीजवळ असणार्या ठाकुर्लीतील चोळेगावात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मातृकृपा ही दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.
आतापर्यंत पंधरा जणांना ढिगार्याखालून बाहेर काढण्यात आले असून, अजूनही काही जण ढिगार्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. बाराजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. महापालिकेने इमारत रिकामी करण्यासाठी नोटीसही बजावली होती. मात्र पर्यायी जागेची सोय नसल्याने रहिवाशांनी इमारत रिकामी केली नाही.
दाटीवाटीची वस्ती आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला इमारतीपर्यंत पोहोचायला विलंब लागला. रात्री अकराच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत असताना आधी जिन्याकडचा भाग कोसळला. या आवाजाने आम्ही घराबाहेर आलो आणि रहिवाशांना तात्काळ खाली येण्यास सांगितले.
पण जिना नसल्याने रहिवाशांना लगेच खाली उतरता आले नाही आणि काही क्षणातच संपूर्ण इमारत खाली कोसळली असे शेजारच्या इमारतीत रहाणार्या रहिवाशाने सांगितले.
जवळपास वीस कुटुंबे या इमारतीत रहात होती. घटनास्थळी अग्निशामन दलाकडून युध्दपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत.
1972 साली बांधण्यात आलेली ही इमारत 43 वर्ष जुनी होती. रात्री इमारत कोसळल्यानंतर लगेचच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते.
केडीएमसीचे अधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेने दोनवर्षांपूर्वीच्या 2013 मधील मुंब्र्यातील लकी कंपाउड इमारत दुर्घटनेची आठवण करुन दिली. त्यावेळी लकी कंपाउड ही इमारत कोसळून 70 पेक्षा अधिक नागरीकांचा मृत्यू झाला होता.