* कॉंग्रेसच्या रविंद्र सावंतानी केली कारवाईची मागणी
* महापालिकेचा प्रताप : तुर्भेतील माता बाल रुग्णालयातील प्रकार
* प्रशासनाचा तुघलकी निर्णयाचा रूग्णांना फटका
नवी मुंबई : तुर्भे येथील महापालिकेच्या माता बाल रुग्णालयाची इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय बंद करून इतरत्र हलविणे आवश्यक असताना महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून या धोकादायक इमारतीत लिफ्ट (उद्वाहक) बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉंग्रेसच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी या खर्चावर तीव्र आक्षेप घेतला असून या प्रकाराला जबाबदार असणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तुर्भे सेक्टर २२ येथे महापालिकेचे रामतनू माता बाल रुग्णालय आहे. या रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने ती धोकादायक बनली आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या बापूजी कन्सल्टंट या सल्लागार कंपनीने ११ ऑगस्ट २०१४ रोजी दिलेल्या संरचनात्मक अहवालात (स्ट्रक्चरल ऑडिट) रुग्णालयाची ही इमारत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे इमारतीचा वापर तत्काळ बंद करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने रुग्णालय सुरू ठेवले आहे.
विशेष म्हणजे इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही अभियंता विभागाने या इमारतीत २२ लाख ८५ हजार रुपये खर्च करून नवीन लिफ्ट बसविली आहे. ही निव्वळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून त्याला जबाबदार असणार्या संबंधित विभागाच्या अधिकारर्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
रामतनू माता बाल रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारर्यांनी २९ जून २०१५ रोजी संबंधित विभागाला पत्र पाठवून पहिल्याच पावसात या इमारतीची झालेली दुर्दशा निदर्शनास आणून दिली होती. पहिल्याच पावसात इमारतीला गळती लागली आहे. कॉलम, भिंतीला तडे गेले आहे.
या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती वैद्यकीय अधिकारर्यांनी संबंधित विभागाकडे केली असली तरी कारवाई झाल्याचे दिसून आले आहे. रामतनू माता बाल रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे ११ ऑगस्ट २०१४ रोजी सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रुग्णालय इतरत्र हलविण्याची शिफारस स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये करण्यात आली होती. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, तुर्भे माता बाल रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी रावसाहेब पोटे उपस्थित होते. या बैठकीत तुर्भे येथील माता बाल रुग्णालय नवीन इमारत होईपर्यंत पूर्णत: बंद करून तेथील वैद्यकीय सेवा बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतरही हे रुग्णालय त्याच अवस्थेत सुरू आहे. उलट दरम्यानच्या काळात मोडकळीस आलेल्या रुग्णालयाच्या या इमारतीत २२ लाख ८५ हजार रुपये खर्च करून नवीन लिफ्ट बसविण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. मात्र त्यानंतरही हे रुग्णालय आहे त्याच अवस्थेत सुरू असल्याचे दिसून आले आहे. मोडकळीस आलेल्या रुग्णालयाच्या या इमारतीत २२ लाख ८५ हजार रुपये खर्च करून नवीन लिफ्ट बसविण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे.