नवी दिल्ली : सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय.
अमेरिकेत व्याज दर वाढण्याची शक्यता हे सोन्याच्या किंमती ढासळण्याचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येतंय. बुधवारी होणार्या फेडरल रिझर्व्ह पॉलिसी मीटिंगमध्ये घेण्यात येणार्या निर्णयाला समोर ठेऊन सोन्याच्या किंमती सुस्तावल्यात.
तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये जवळपास एका दशकानंतर पहिल्यांदाच अमेरिकेत व्याज दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळेच, सोन्याच्या किंमतींवर उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत व्याज दर वाढल्यानंतर साहजिकच डॉलर्समध्ये गुंतवणूक करणं हे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळेच सोन्याचं मूल्य ढासळण्याची शक्यता आहे.