भंडारा : सेल्समन बनून दोन घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेची हत्या झालीय तर दोन जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरच हादरलंय.
गुरुवारी संध्याकाळी या घटना घडल्या. पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात घुसून या दरोडेखोरांनी किचनमध्ये प्रवेश केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.
ताकिया वॉर्डातील एका घरात घुसून दरोडेखोरांनी प्रीती पटेल या महिलेकडे पाणी मागितलं. ती पाणी देण्यासाठी आत वळली असता दरोडेखोरांनी तिच्या घरात प्रवेश केला. यामुळे, घाबरलेल्या प्रीतीनं त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, दरोडेखोरांनी तिच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
तर, दुसरीकडे म्हाडा कॉलनीतही अश्विनी शिंदे ही तरुणी घरात एकटी असताना दरोडेखोरांनी घरात शिरकाव केला. प्रसंगावधान राखत अश्विनीनं आरडाओरड केल्यानंतर मात्र दरोडेखोरांनी तिथून धूम ठोकली. पण, या घटनेत अश्विनी आणि आठ वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झालेत. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पुरावे गोळा करण्यासाठी डॉग स्कॉडचा वापर केला गेला पण पोलिसांच्या हाती अद्याप काही सुगावा लागलेला नाही.