संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : पावसाळ्यात नवी मुंबईत साथीच्या आजाराचा उद्रेक आणि त्यात होणारे नवी मुंबईकरांचा मृत्यु ही नित्याचीच बाब बनली आहे. महापालिका प्रशासन आरोग्यविषयक सुविधांचा कितीही गाजावाजा करत असले तरी महापालिका प्रशासनाच्या आरोग्यविषयक कामकाजाच्या मर्यादा साथीचे आजार लगेच नवी मुंबईकरांसमोर स्पष्ट करतात. घणसोली कॉलनीत सिम्पलेक्स या माथाडी कामगारांच्या वसाहतीत डेंग्यू आजाराने २० वर्षीय माथाडी कामगाराच्या मुलाचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला.
घणसोली कॉलनीतील सिम्पलेक्स सोसायटीमध्ये डी-५ मध्ये राहणार्या अक्षय नारायण जंगम यास डेंग्यूची लागण झाली. काही दिवस कोपरखैराणेतील माथाडी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यावर त्यास वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
घणसोली कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढीस लागला असून महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोनच दिवसापूर्वी मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष सतीश केदारे यांनी महापालिका अधिकार्यांना येथील समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते.