नवी मुंबई : धोकादायक तसेच वाहतुकीला अडथळा आणणार्या वृक्ष फांद्यांची छाटणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान / वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये आता दोन नवीन वृक्ष छाटणी वाहनांची भर पडत असून शुक्रवारी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालय आवारात या वाहनांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण, वाहन विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, एल.बी.टी. विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ २ चे उप आयुक्त सुरेश पाटील, प्र. मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमाकांत पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, उद्यान विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्य:स्थितीत उद्यान / वृक्ष प्राधिकरण विभागाकडे उपलब्ध दोन वृक्ष छाटणी वाहनांपैकी एक वृक्ष छाटणी वाहन पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. त्यामुळे अधिक वृक्ष छाटणी वाहनांची गरज भासत होती. यास्तव अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नवीन वृक्ष छाटणी वाहन घेण्याचे निश्चित करण्यात येऊन आज टाटा ९०९ चेसीसवर बांधणी केलेल्या दोन नवीन वृक्ष छाटणी लॅडर वाहनांचा शुभारंभ संपन्न झाला.
या आधुनिक वाहनांव्दारे १३ मीटर उंचीपर्यंत जाऊन झाडांच्या फांद्या कापता येणे शक्य होणार आहे. हे लॅडर व्हॅन चारही बाजूंनी ३६० अंशात गोलाकार फिरणार असल्याने कोणत्याही बाजूच्या फांद्या कापता येणार आहेत. या वाहनामध्ये तब्बल ५०० किलो वजन घेण्याची क्षमता असणारे मजबूत बकेट उपलब्ध करुन देण्यात आले असून याव्दारे कोणत्याही ठिकाणी जाऊन वृक्ष फांद्या छाटणी सहजशक्य होणार आहे. यापुढे उद्यान / वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामांसाठी बेलापूर – नेरुळ विभाग, तुर्भे – वाशी विभाग आणि कोपरखैरणे ते दिघा विभाग यामध्ये उपलब्ध तीन वृक्ष छाटणी वाहने कार्यरत राहणार आहेत.
या वाहनांमुळे झाडांचा समतोल राखला जाईल तसेच आपत्कालीन परिस्थितीतही या वाहनांचा उपयोग होणार आहे. एखादी संस्था / सोसायटी यांना या वाहनाची गरज भासल्यास नियमानुसार निश्चित केलेल्या दरांमध्ये हे वाहन उपलब्ध करुन देण्याची सुविधा आहे.
या वाहनांवर वृक्ष ज्याच्या दारी – ऑक्सीजन त्याच्या घरी, पर्यावरणाचा समतोल राखू – शुध्द हवा पाणी चाखू – असे पर्यावरण विषयक जनजागृतीपर संदेश प्रसारीत करण्यात येत असून हे वाहन एकप्रकारे पर्यावरणाचा संदेशदूतही ठरणार आहे.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून या कामी पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिक यांचेही बहुमोल सहकार्य मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीला / रहदारीला अडथळा आणणार्या अथवा रस्त्यावरील पथदिव्यांच्या प्रकाशाला अडथळा आणणार्या आवश्यक तेवढ्याच फांद्या झाडांचा समतोल बिघडणार नाहीत येवढ्याच प्रमाणात महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांतून रितसर परवानगी घेऊन छाटणी कराव्यात असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.