कल्याण : चोराला पाठलाग करण्याच्या प्रयत्नात लोकलची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कल्याणमध्ये घडली. प्राजक्ता गुप्ते असे या तरुणीचे नाव आहे.
गुरुवारी रात्री प्राजक्ता नेहमीप्रमाणे घरी परतत होती. कल्याणच्या दिशेने येत असताना लोकल काही वेळासाठी पत्रीपुलाजवळ थांबली. यावेळी एका चोरट्याने प्राजक्ताची बॅग घेऊन तेथून पळ काढला. चोरट्याला पकडण्यासाठी प्राजक्ता लोकलमधून उतरली आणि तिने चोराच्या मागे धावण्यास सुरवात केली. मात्र त्यावेळी कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणार्या लोकलची धडक प्राजक्ताला बसली. यात तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.