मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत शाहरुख खानच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशावर घातलेली पाचवर्षांची बंदी उठवण्यात आली आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक असणार्या शाहरुखने मे 2012 मध्ये स्टेडियममधील सुरक्षारक्षक आणि एमसीएच्या पदाधिकार्यांबरोबर हुज्जत घातल्याने त्याच्यावर पाचवर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती.
केकेआर आणि मुंबई इंडियन्समधील सामन्यानंतर हा वाद झाला होता. शाहरुखवर 2017 पर्यंत स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी संपवावी असे एमसीएमधील काही पदाधिकार्यांचे मत होते.
शाहरुखने तीन वर्षात एकदाही बंदी आदेश मोडून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे दोनवर्ष आधीच त्याच्यावरील बंदी उठवावी असे काही एमसीए पदाधिकार्यांचे मत आहे.
त्यानुसार रविवारी दुपारी झालेल्या एमसीए पदाधिकार्यांच्या बैठकीत दोनवर्ष आधीच शाहरुखवरील बंदी उठवण्यात आली. बीसीसीआय आणि आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला हे सुध्दा शाहरुखवरील बंदी एमसीएने उठवावी या मताचे होते.