नवी दिल्ली : विम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्या भारताच्या सानिया मिर्झाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.
विम्बल्डन स्पर्धेत मार्टिना हिंगीसच्या साथीनं महिला दुहेरीच्या गटावर वर्चस्व प्रस्थापित करून सानिया मिर्झानं इतिहास रचला होता. तिच्या या यशाचा गौरव म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सानिया मिर्झाच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली.
यापाठोपाठ तिनं जागतिक मानांकन यादीच्या अव्वल स्थानी पोचण्याचीही किमया केली होती. त्यामुळं सानियाच्या नावाची क्रीडा जगतातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली असल्याची माहिती खात्याचे सचिव अजित मोहन शरण यांनी दिली.