मुंबई : मराठी चित्रपट आणि त्याचा प्रेक्षकवर्ग जसा वाढत आहे त्याप्रकारे मराठी चित्रपटांमध्ये अनेक अमराठी कलाकार मंडळी देखील मनापासून सहभागी होत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, लय भारी सलमान, अशी उदाहरणं देता येईल तेवढी कमीच. या सगळ्यांच्या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ग्लॅमरस लूक मध्ये दिसणारी बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार्या ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटात ती तिच्या ग्लॅमरस रुपात एका प्राध्यापिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याकरिता मुनमुनने मराठी भाषा देखील शिकून घेतली.
या सिनेमात मनवा नाईक, भूषण प्रधान आणि खुर्शीद लॉयर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या नावावरून नेमकं काय ढिनच्यॅक असेल याची सगळयांनाच उत्सुकता लागली आहे. पण या चित्रपटाचा ढिनच्यॅक एलिमेंट म्हणजे त्याची कथा आहे. एखादी वस्तू समोरच्याला विकत घ्यायला लावणे म्हणजेच मार्केटिंग नसून त्याचा समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठीदेखील वापरता येऊ शकतं हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे विशेष आहे. निशांत सपकाळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. या चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत.