गणेश पोखरकर
कल्याण : कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विकसीत होत असलेल्या गोविंदवाडी बायपास, निधी अभावी रखडल्यामुळे सन २००९ साली कल्याण जिल्हा भाजपाच्यावतीने कल्याणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अटक करून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या माजी मंत्री भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर आदींना कल्याण जिल्हा सत्र न्यायलयाने समन्स बजावले होते. या समन्समुळे भाजपा नेत्यांनी गुरुवारी न्यायलयात हजेरी लावली.
कल्याण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी गोविंदवाडी बायपास विकसीत करण्याचे काम महापालिकेच्या सहकार्याने एमएसआरडीसीने हाती घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा बायपास बांधणीसाठी एमएसआरडीसीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण एमएसआरडीसीकडून पुढे केले जात होते. यावेळी सन २००९ साली भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या आंदोलनात त्यांच्यासमेवत डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर तथा विद्यमान आमदा नरेंद्र पवार यांना देखील अटक करण्यात आली होती. यावेळी आमदार चव्हाण यांनी जामीन नाकारल्यामुळे त्यांना १४ दिवस तुरुंगवास झाला होता. भाजपा नेत्यांच्या आंदोलनच्या दबावतंत्रामुळे यावेळी गोविंदवाडी बायपासच्या बांधणीसाठी आघाडी शासनाने तात्काळ १५ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देऊन रस्त्याच्या बांधणीला सुरुवात केली. याच आंदोलनाच्या माध्यमातून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने भाजपाच्या नेत्यांना समन्स बजावले होते. यामुळे त्यांनी न्यायालयात हजेरी लावली.