कराची : 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील फरार आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊदचा उजवा हात समजला जाणार्या येडा याकूबचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. येडा याकूब काही दिवसांपासून आजारी होता. मात्र गुरुवारी त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे भारताच्या माहितगार सूत्रांकडून समजते.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील याकूब खान उर्फ येडा याकूब हा एक प्रमुख आरोपी होता. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर टायगर मेमनसोबत येडा याकूबही पाकिस्तानात पळून गेला होता. कराचीत येडा याकूब कापडाचा व्यापार करत होता. तेथे त्याचे कापडाचे दुकान असल्याचे समजते. येडा याकूबची पत्नी आणि मुले मुंबईत रहातात. त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटात त्याचा थेट सहभाग असल्याने टायगर मेमनसह येडा याकूब याचा देखील मुंबई पोलीस गेले अनेक वर्ष शोध घेत होते. सीबीआयने रेड कॉर्नर नोटीस आणि लूकआऊट नोटीस बजावली होती. मात्र, पाकिस्तानात दडून बसलेला येडा याकूब शेवटपर्यंत मुंबई पोलिसांच्या हाती लागला नाही.
दरम्यान, येडा याकूबच्या मृत्यूचे वृत्त वाचले आहे, परंतू अद्याप त्याची खात्री झाली नसल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.
याकुब आणि त्याचा मोठा भाऊ माजिद खान यांनी साखळी बॉम्बस्फोटात प्रमूख भूमिका बजावली. त्या दोघांनीच रायगडमधून आरडीएक्स मुंबईत आणले. त्यानंतर माहिम येथील अल हुसैनी इमारतीत रहाणार्या मेमन बंधूंच्या मदतीने तेथे बॉम्ब तयार करुन हा स्फोटक साठा गाड्यांमध्ये भरुन त्यांनी बॉम्बस्फोट घडवण्याच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम केले.
त्यानंतर ते दुबईला आणि मग कराचीला पसार झाले. यातील माजिद उर्फ एम. के. बिल्डर याला 2000 मध्ये छोटा राजनच्या टोळीने बांद्रा येथे गोळ्या घालून ठार मारले.