नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागच्या सहा दशकात देशात गुणवत्तेच्या आधारावर उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था ताब्यात घेऊन उध्वस्त करायला निघाला आहे असा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.
पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन त्यांनी आरएसएसला लक्ष्य केले. राहुल आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन राष्ट्रपती भवनात गेले तेथे त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरुन निर्माण झालेल्या वादामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा अशी त्यांनी मागणी केली.
राहुल गांधी यांनी पुण्यात जाऊन एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आरएसएसने शैक्षणिकत संस्था ताब्यात घेणे हा राजकीय मुद्दा आहे. मी याचे राजकरण करत नाही. भाजप या मुद्यावर राजकारण करत आहे असा आरोप त्यांनी केला.
एफटीआयआयचे विद्यार्थी मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. १२ जून पासून तासिकांवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला आहे. एफटीआयआय सारख्या संस्थेचे अध्यक्ष होण्याची चौहान यांची योग्यता नाही. त्यामुळे चौहान यांना पदावरुन तात्काळ काढून टाकावे तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलावंतांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.