सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेसच्या पॅनेलचा १३ विरुद्ध ३ अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला.
बाजार समितीच्या १९ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीपासून एकमेकांविरोधात ठाकलेल्या जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. जिल्हा बँक जयंत पाटील यांनी ताब्यात घेतल्यानंतर पतंगराव कदम यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. शिराळा बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीच्या सोबतीने जिंकली. खानापूर बाजार समितीत त्यांनी शिवसेनेशी युती करून कॉंग्रेसच्याच एका विरोधी गटाला सत्तेपासून दूर ठेवले. सांगली बाजार समितीची निवडणूक तिन्ही माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती. जिल्हा बँकेत पराभव पत्करावा लागलेल्या माजी मंत्री मदन पाटील यांना या निवडणुकीत सहज विजय मिळाला. पण जयंत पाटील गटाला केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत आणि सोसायटी गटावर निर्विवाद वर्चस्व मिळवत पतंगराव कदम, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा रयत पॅनलने १३ जागा जिंकल्या, तर तीन अपक्ष निवडून आले.
लोकसभा-विधानसभेेचे निकाल आणि आर. आर. पाटील यांचे निधन यानंतर सांगली जिल्ह्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले होते. जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकांनंतर जयंत पाटील आणि पतंगराव असे दोनच प्रभावी गट निर्माण झाले आहेत. वसंतदादा घराणे विभागले आहे. त्यापैकी एक गट जयंत पाटील यांच्यासोबत आहे, तर दुसरा पतंगराव यांच्यासोबत आहे. बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजप आमदार, खासदार यांना सोबत घेतले होते, तर पतंगरावांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नाराजांची मोट बांधली होती.