** आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करुन एमआयडीसी प्राधिकरणाकडून ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली रेल्वे स्थानक आणि माईंडस्पेस कंपनीसमोर पहिला स्कायवॉक बांधण्यास सुरुवात झाली आहे. या स्कायवॉकच्या कामाची पाहणी गुरूवारी आमदार नाईक यांनी केली आणि उपयुक्त सुचना केल्या.
ऐरोली रेल्वे स्थानकातून माईंडस्पेस, रिलायबल प्लाझा आणि इतर कंपन्यांमध्ये दररोज येणार्या आणि जाणार्या कामगारांची संख्या सुमारे २०हजार आहे. हे कामगार आणि इतर प्रवाशांना दररोज असुरक्षितपणे या ठिकाणी रस्ता ओलांडावा लागतो. नविन स्कायवॉकमुळे आता या सर्वांना रस्ता ओलांडणे सुरक्षित होणार आहे. याशिवाय मोठया प्रमाणावर रस्ता ओलांडणार्या प्रवाशांमुळे या ठिकाणी जी वाहतुककोंडी होत होती ती आता होणार नाही. अडीच कोटी रुपये खर्च या स्कायवॉकसाठी अपेक्षित आहे. तसेच येथून जाणार्या जड वाहनांची उंची लक्षात घेता या स्कायवॉकची उंची देखील जास्त ठेवण्यात आली आहे. एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी यांनी या स्कायवॉकविषयी आमदार संदीप नाईक यांना माहिती दिली. स्कायवॉकच्या बांधकाम आराखड्यात ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी लिफटची सोय नसल्याचे आमदार नाईक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपअभियंता माळी यांच्याकडे लिफट बसविण्याची मागणी केली.
या स्कायवॉकच्या पाहणी दौर्याप्रसंगी आमदार नाईक यांनी सांगितले की, ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी किंवा वाहतुककोंडी सुटण्यासाठी सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका पायाभूत सुविधांवर खर्च करीत असते. मात्र हा खर्च इतरही संबंधीत प्राधिकरणाने उचलला पाहिजे, अशी आमची भुमिका असून त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु होते. एमआयडीसीकडून स्कायवॉकची मंजुरी मिळविल्यानंतर या प्रयत्नांना पहिले यश आले आहे, याचा मला आनंद आहे. आघाडी शासनाच्या काळात तत्कालिन उद्योगमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करुन ठाणे-बेलापूर मार्गावर एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन उड्डाणपूल मंजुर करुन घेतले. ही कामे सुरु होण्याच्या प्रक्रीयेत आहेत. या उड्डाणपूलांमुळे या मार्गावरील वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईत रेल्वे क्रॉसिंग आणि इतर ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा निर्माण करण्यावर यापुढे भर राहणार असल्याचा मनोदय आमदार नाईक यांनी व्यक्त केला.
ऐरोली रेल्वे स्थानकाशेजारील भुयारी मार्गाची देखील आज आमदार नाईक यांनी पाहणी केली. या मार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी त्यांना कळविले होते. आमदार नाईक यांनी तातडीने पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. तसेच १५ ऑगस्टपर्यत या भुयारी मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.
आजच्या पाहणी दौर्याप्रसंगी आमदार नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आणि इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.