** सिडकोचे माजी संचालक नगरसेवक नामदेव भगत यांचा महापालिका ते मंत्रालय लेखी पाठपुरावा
नवी मुंबई : नवी मुंबईतील शिल्लक प्लॉटचा वापर फक्त गृहनिर्माण प्रकल्पांकरताच करणेकरीता सिडकोला निर्देश देण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात सध्या गावठाणातील तसेच त्या परिसरातील गरजेपोटी बांधण्यात आलेल्या बांधकामांवर अतिक्रमणविरोधी कारवाईचा दांडपट्टा फिरविला जात आहे. पण ही वेळ का निर्माण झाली याचा सर्वप्रथम विचार करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने सिडकोला नवी मुंबई विकसित करण्याचे अधिकार देताना औद्योगिकरण व शहरीकरण आणि नागरीकरण सर्वस्वी सिडकोलाच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. शहर वसविताना सिडकोने सुरूवातीच्या काळापासून गृहनिर्माण क्षेत्राला प्राधान्य देत ईमारतींची निर्मिती केली. पण या ईमारतीमधील सदनिकांपेक्षा गावठाण भागात, चाळींमध्ये अथवा अन्य बिल्डरांकडे स्वस्त दरात घरे उपलब्ध होत गेल्याने गरजू गोरगरीबांना तिकडे आपले घर वसविण्याला प्राधान्य दिले. दुसरीकडे शासनाने गावठाण विस्तार योजना राबविण्यात आणि साडेबारा टक्के योजनेतील हक्काचे भुखंड देण्यात विलंब केल्याने आगरी-कोळी समाजबांधवांचे परिवार 1970 ते 2015 पर्यतच्या कालावधीत वाढत गेले. सुरूवातीची 1970 सालची लोकसंख्या व आताची 2015 सालची लोकसंख्या पाहता परिवाराची निवासी गरज भागविण्याकरता गरजेपोटी घरे बांधण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय स्थानिक आगरी-कोळी समाजबांधवांपुढे तसेच गरीब रहीवाशांपुढे उपलब्ध नसल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनातून संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले.
गोरगरीब, गरजू, मध्यमवर्गीयांनी आपली बचत व घरातील दागदगिने मोडून या घरात आपले संसार थाटले आहेत. बिल्डर घरे विकून व आपले उखळ पांढरे करून निघून गेले आहेत. त्यामुळे या कारवाईत या सदनिकांमध्ये राहणारे गोरगरीब, गरजू, मध्यमवर्गिय भरडले जाण्याची शक्यता असून आपले छप्पर गमविण्याच्या भीतीने ते मानसिक नैराशयेमध्ये वावरू लागले आहेत. येथील घराघरामध्ये भीतीचे वातावरण आहे. आपण या बाबींचा भावनिक पातळीवरदेखील विचार करणे गरजेचे असल्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.
नवी मुंबईत आजही लोकसंख्या वाढत आहे. रोजगार व शिक्षणाकरता आजही नवी मुंबईत लोकवस्ती वाढत आहे. भविष्यात पुन्हा नवी मुंबईत अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे वाढीस लागू नये याकरताच आताच पाऊले उचलणे गरजेचे आहे. नवी मुंबईत शिल्लक असलेल्या भुखंडाची सिडकोने विक्री न करता त्या भुखंडावर गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करून गोरगरीब जनतेला परवडतील अशा दरामध्ये सदनिकांची विक्री करण्याचे सिडकोला निर्देश द्यावेत. गावठाण अथवा अनधिकृत ईमारतीमध्ये मिळणार्या दरामध्ये ना नफा ना तोटा या धर्तीवर सिडकोने सदनिका उपलब्ध करून दिल्यास कोणीही अनधिकृत ठिकाणी सदनिका विकत घेणार नाही आणि त्यांची फसवणूक होणार नाही. नवी मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता आपण सिडकोला मज्जाव करावा. नवी मुंबईतील शिल्लक भुखंडांची विक्री न करता त्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करून अत्यल्प दरामध्ये सदनिकाची विक्री करावी. आपण नवी मुंबईतील सध्याची परिस्थिती विचारात सिडकोला त्याबाबतचे आदेश देण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.