मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तहेर यंत्रणेने याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिल्यानंतर राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीआधी गुप्तहेर यंत्रणेकडून काही माहिती दिली जाते. आयबीकडून याबाबत नियमित माहिती दिली जाते. मात्र यावेळी आयबीकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.
30 जुलै नागपूरच्या तुरुंगात याकूबला फाशी देण्यात आली. या फाशीवरुन 15 ऑगस्ट रोजी राज्यात अंडरवर्ल्ड अथवा दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता आयबीने व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईसह नागपूर आणि पुणे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये सर्व प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही दररोज मॉनिटर केले जात आहेत. गुन्हे विभाग, एटीएस आणि पोलीसांकडून मुंबईतील हॉटेल्स आणि लॉजमधील येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणारे रजिस्टरही तपासले जात आहेत.