नवी मुंबई : वाचावेसे वाटेल अशा विविध विषयांवरील पुस्तकांमधून एकदा वाचनाची गोडी लागली की पुढे उच्च शिक्षणामध्ये मोठमोठी पुस्तके वाचण्याची सवय आपोआप लागेल अशा शब्दात प्रत्येकाच्या जीवनातील पुस्तकांचे व वाचनाचे महत्व सांगत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी उपलब्ध करुन दिली जाणारी ग्रंथालय सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाची ठरेल असे स्पष्ट करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि रुम टू रीड इंडिया या संस्थेच्या वतीने महापालिका शाळांतून दिल्या जाणा-या ग्रंथालय सुविधेच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. शाळा क्र. 28, से 15, वाशी येथे संपन्न झालेल्या या समारंभाप्रसंगी महापौरमहोदयांसह शिक्षण विभागाचे उप आयुक्त अंबरिश पटनिगिरे, शिक्षण अधिकारी दत्तात्रय नागरे, रुम टू रीड इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय संचालक सौरभ बॅनर्जी व राज्य व्यवस्थापक राज शेखर, विजय वाळुंज, अजय वाळुंज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण विभागाचे उप आयुक्त अंबरिश पटनिगिरे यांनी आपल्या मनोगतात आजच्या माध्यम युगात मुलांमध्ये वाचनाची आवड व सवय कमी झाल्याचे दिसून येते, तथापि वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचन हे प्रगतीचा पाया असल्याने रुम टू रिड मार्फत ग्रंथालयाची अभिनव संकल्पना राबविल्याचे सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमार्फत ही संकल्पना यशस्वीकरून दाखवावी असे आवाहन करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धोरण अंगिकारलेल्या शिक्षण विभागाचा निकाल यावर्षी मागील वर्षीपेक्षा अधिक चांगला लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुम टू रिड या संस्थेचे राष्ट्रीय संचालक सौरभ बॅनर्जी यांनी ही संस्था दहा देशांमध्ये व भारतात महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करीत असल्याचे सांगत लहान वयातच मुलांची पायाभूत कौशल्य क्षमता विकास करणारे उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. ग्रंथालय निर्मिती हा त्याचाच एक भाग असून या ग्रंथालयात कार्टून स्वरुपातील चित्रांच्या पुस्तकांपासून सर्व वयोगटांना भावतील अशा विविध विषयांवरील साधारणत: 1 हजार पुस्तके प्रत्येक ग्रंथालयात ठेवण्यात येतील असे सांगितले. याशिवाय मुलांना पुस्तकातील गोष्टी कशा सांगायच्या व त्यांची गोष्टींमधील गोडी कशी वाढवायची याकरीता संस्थेमार्फत तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
रुम टू रिड इंडिया या संस्थमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 40 शाळांमध्ये ग्रंथालय सुविधेचा उपक्रम सुरु करण्यात येत असून ग्रंथालय खोलीही वाचनाचा उत्साह वाढवेल व मुलांना आकर्षित करेल अशा रितीने चित्रमय सजविण्यात आलेली आहे. यावर बोलताना महापौरांनी शाळेची भिंत कोरी नको तर मुलांना आपलीशी वाटेल अशी बोलकी हवी अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सजावट केलेल्या 40 शाळांच्या ग्रंथालय खोल्यांमध्ये प्रत्येकी तीन कपाटे, चार टेबल, 1000 पुस्तके, चार पुस्तक प्रदर्शन बॅग, दोन कार्पेट अशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पुस्तके हातात पडल्यानंतर ती वाचतानाचा मुलांच्या चेह-यावरील आनंद सर्वात महत्वाचा आहे असे सांगत महापौरांनी वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.