सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महापालिका कर्मचारी तिकीट देण्यासच वंडर्स पार्कच्या खिडकीवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना तिकीट भेटले नाही, परिणामी वंडर्स पार्कमधील सुरक्षा रक्षक नागरिकांना वंडर्स पार्कमध्ये प्रवेश देत नव्हते. एकीकडे नागरिकांचा संताप आणि दुसरीकडे सुरक्षा रक्षकांची अगतिकता ही कोंडी आमदार संदीप नाईकांमुळे फुटली. आमदार संदीप नाईकांनी त्वरीत हालचाली केल्यामुळे सर्वच नागरिकांना स्वातंत्र्यदिनी वंडर्स पार्कमध्ये प्रवेश मिळाला. आमदार संदीप नाईक ऐरोली मतदारसंघाची नाही तर सर्व नवी मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचा संदेश स्वातंत्र्यदिनी नवी मुंबईकरांमध्ये पुन्हा एकवार गेला आहे.
वंडर्स पार्क तोट्यात असल्याचे तसेच वंडर्स पार्कची देखभाल खर्चिक असल्याचे महापालिका प्रशासनदरबारी पहावयास मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र वंडर्स पार्कच्या तिकिटखिडकीवर तिकीट देण्यासच पालिकेचा कर्मचारी पूर्णवेळ उपलब्ध नसल्याचे आज स्वातंत्र्यदिनी पहावयास मिळाले. करोडो रूपये खर्च करून नेरूळ सेक्टर 19 मध्ये महापालिका प्रशासनाने बांधलेल्या वंडर्स पार्कविषयी फारसे देणेघेणे नसल्याचे व याठिकाणी आजही सावळागोंधळ असल्याचे खुद्द आमदार संदीप नाईकांच्या निदर्शनास आले आहे. सकाळच्या वेळी 20 आणि रात्रीच्या वेळी 10 अशा 30 सुरक्षारक्षकांच्या हातात वंडर्स पार्कचा कारभार असल्याचे आजच्या सावळागोंधळ प्रकरणावरून स्पष्ट झाले.
सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 अशा कालावधीत वंडर्स पार्क नवी मुंबईकरांसह शेजारच्या परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वारावरील माहिती फलकावरून उपलब्ध होते. तथापि सकाळी 11 नंतर वंडर्स पार्कच्या तिकीट खिडकीवरून अनेकदा तिकीट देण्यास महापालिकेचा कर्मचारीच उपलब्ध नसल्याने नवी मुंबईकरांना अनेकदा निराश होवून परत जावे लागते. तिकीट खिडकीवरील कर्मचारी सकाळी 11 वाजता अथवा त्याअगोदरच अनेकदा निघून जात असल्याची माहिती यावेळी वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांकडून यावेळी देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व आमदार संदीप नाईक यांचे कडवट समर्थक हे सकाळी 10.40च्या सुमारास वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वारावरून जात असताना त्यांना त्या ठिकाणी अनेक नागरिक, महिला व लहान मुले वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये काही नागरिक आपल्या परिवारासह ठाणे-भाईंदर या ठिकाणाहूनही आले होते. चौकशी केल्यावर समजले की तिकीट खिडकीवर महापालिकेचा कर्मचारी तिकीट देण्यास उपलब्ध नसल्याने या लोकांना वंडर्स पार्कमध्ये सुरक्षा रक्षक त्यांना प्रवेश देत नव्हते. त्यांना दुपारी 3 वाजता येण्यास सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत होते. इतक्या लांबून आलो आहोत, चार तास कोठे टाईमपास करू असे हे नागरिक व महिला सुरक्षा रक्षकांना सांगत होत्या.
याठिकाणी स्वत: खांडगेपाटील यांनी चौकशी करून तात्काळ आमदार संदीप नाईकांशी संपर्क साधून प्रकरणाची कल्पना दिली. महापालिकेचा कर्मचारी तिकीट खिडकीवर नसल्याने नागरिकांना प्रवेश मिळत नसल्याचे खांडगेपाटील यांनी आमदार संदीप नाईकांच्या निदर्शनास आणून दिले. आमदार संदीप नाईकांनी खांडगेपाटील यांना 5 मिनिटात या प्रकरणी मी कार्यवाही करतो, परंतु या लोकांना वंडर्स पार्कमध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय तेथून न जाण्याचे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी खांडगेपाटील यांना दिले. नागरिकांचा व महिलांचा वाढता संताप पाहून खांडगेपाटील यांनी सुरक्षारक्षकांचे वरिष्ठ मिश्रा यांना संपर्क साधून प्रकाराचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी महापालिकेच्या तायडे यांनी संपर्क साधा असे सांगून आपले हात वर केले. तायडे यांना खांडगेपाटील यांनी सातत्याने संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बिझी येत होता. आमदार संदीप नाईक सातत्याने भ्रमणध्वनीवरून नागरिकांशी संपर्क साधत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. आमदार संदीप नाईकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना धारेवर धरत घडल्या प्रकाराची माहिती मागवून घेतली. अवघ्या 7 ते 8 मिनिटातच वंडर्स पार्कच्या प्रवेश सुरक्षारक्षकांना त्यांच्या वरिष्ठांचे फोन येण्यास सुरूवात झाली. प्रवेशद्वारावरील ताकटळत असलेलल्या सर्वच लोकांना, महिलांना, लहान मुलांना मोफतपणे आज वंडर्स पार्कमध्ये प्रवेश मिळाला. वंडर्स पार्कमध्ये प्रवेश मिळालेल्या नागरिकांना सुरक्षा रक्षक त्रास देणार नाही ना, परत लगेच बाहेर काढणार नाही ना, याची लांबून पाहणी करण्याच्या सूचना आमदार संदीप नाईकांनी खांडगेपाटील व त्यांच्या सहकार्यांना दिल्या. दुपारी 12.15 वाजता वंडर्स पार्कमधून सर्व नागरिक बाहेर आल्यावर आमदार संदीप नाईकांना पुन्हा त्याची कल्पना देण्यात आली.
सुरक्षारक्षक सकाळी 11 नंतर पार्कचे तिकीट दिले जात नसल्याचा नियम असून फलकावर त्याची माहिती असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात तसा कोणताही नियम नसून फलकावर कोठेही नियम नसल्याचे निदर्शनास आले. महापालिकेचा कर्मचारी तिकीटखिडकीवर नसल्याने नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना परत जावे लागत असल्याने तिकीट खिडकीवरील कर्मचार्यांची व तिकीट देण्याच्या वेळेची चौकशी करण्याची मागणी यावेळी संतप्त नागरिकांंकडून करण्यात येत होती. आमदार संदीप नाईक यांनी याप्रकरणी केलेल्या हालचालीमुळे नागरिकांना, महिलांना, मुलांना मोफत प्रवेश मिळाल्याने संबंधितांकडून आमदार संदीप नाईकांचे आभार मानले जात होते. आमदार संदीप नाईकांचे कार्यक्षेत्र ऐरोली विधानसभा मतदारसंघच नाही तर आजही संपूर्ण नवी मुंबई शहरच असल्याचा संदेश आमदार संदीप नाईकांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या कृतीतून नवी मुंबईकरांना दाखवून दिला आहे.