नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 69 व्या वर्धापन दिन आज सिडको भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते सिडको भवन प्रांगणात सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी अप्पर पोलीस महासंचालिका तथा मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी सिडको सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली आणि राष्ट्रगीत म्हटले. याप्रसंगी अधिकारी कर्मचार्यांशी संवाद साधताना भाटिया म्हणाले की, मागील वर्षभरात सिडकोने अनेक महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या, त्या कार्यान्वित केल्या तर काही प्रकल्प पूर्णही केले. पारदर्शक प्रशासनासाठी जाहीर केलेल्या अनेक योजना आपण कार्यान्वित केल्या, संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि लोकांसाठी आवश्यक असलेली माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरीनेच सिडकोकडून खारघर, कामोठे, पनवेल हे ब्राउन फिल्ड स्मार्ट सिटी म्हणून तर पुष्पक आणि नैना हे शहर ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पारदर्शक प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांबरोबरच इतरही अनेक उपक्रम, योजना सिडकोतर्फे हाती घेतल्या जातील. त्यात सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी अधिक उत्साहाने व जोमाने कार्यरत व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यावेळी म्हणाल्या की आपण नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहोत आणि जनहितार्थ संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करण्यात येत असलेली विस्तृत माहिती पारदर्शक प्रशासनाची मोहीम अधिक स्पष्ट करीत आहे हिच प्रतिमा अबाधित राहण्याकरीता अधिक कार्यदक्ष होऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहन निनावे यांनी केले.