नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्या गावठाणामधील आणि गावठाणाबाहेरील बांधकामाच्या मोबदल्यात देण्यात येणार्या भूखंडांच्या संदर्भातील सहावी सोडत दिनांक 15 ऑगस्ट रोजी सिडको सभागृह, 7वा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे यशस्वीरीत्या पार पडली. या सोडतीद्वारे कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली गावातील 743 बांधकामधारकांकरीता भूखंडांचे क्रमांक निश्चित करण्यात आले. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोचे संकेतस्थळावरून करण्यात आले.
या सोडतीस पर्यवेक्षण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीश एम. एन. कुलकर्णी, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी व्हि. एस. धोंगडे, महावितरणचे उपमहाव्यवस्थापक (मा.तं.) जयप्रकाश सोनी, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे वार्ताहर मनोज जालनावाला आणि सिडकोचे माजी मुख्य अभियंता के. वाय. जोशी यांनी उपस्थिती दर्शविली.
सोडतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करताना बांधकाम धारकाचे नाव, बांधकाम धारकाची पात्रता आणि उपलब्ध भूखंडांची संख्या या गोष्टींचा विचार करण्यात आला. पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी उलवे नोडमधील वहाळ येथे भूखंड विकसित करण्यात येत आहेत. एकूण 167 ब्लॉक्सपैकी कोल्ही गावासाठी 10 ब्लॉक्स, कोपर गावासाठी 25 ब्लॉक्स, वाघिवली वाडा गावासाठी 13 ब्लॉक्स, वरचे ओवळे गावासाठी 15 ब्लॉक्स, उलवे गावासाठी 28 ब्लॉक्स, तरघर गावासाठी 14 ब्लॉक्स, कोंबडभुजे गावासाठी 27 ब्लॉक्स, गणेशपुरी गावासाठी 19 ब्लॉक्स आणि वाघिवली गावासाठी 16 ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये ठराविक क्षेत्रफळाचे भूखंड आहेत. सोडतीतील निर्णयानुसार ब्लॉकमधील भूखंड क्रमांक निश्चित करण्यात आले.
सदर सोडत काढण्यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी, पुणेतर्फे चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. या सोडतीत भूधारकांचे नाव व भूखंड क्रमांक यांची सरमिसळ करण्यात आली. ही सरमिसळ 9999 प्रकारे करण्याची सोय या प्रणालीमध्ये आहे. सोडतीवेळी 0001 ते 9999 यांपैकी कोणतीही एक चार अंकी संख्या सीड नंबर म्हणून उपस्थित मान्यवरांकडून घेऊन त्यानुसार यादृच्छिक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. प्रत्येक ब्लॉकसाठी स्वतंत्र सोडत काढण्यात आली.
सोडतीनंतर संपूर्ण निकालाचा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकालाची प्रत सिडकोच्या सूचना फलकावरदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे. सोडतीमधील भूखंडांचे वाटप भूसंपादनाचा निवाडा जाहीर केल्यानंतर करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी निश्चित करण्यात आलेले भूखंड त्यांच्या क्रमांक व क्षेत्रासह उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना कळविण्यात येईल. त्यानंतर भूसंपादनासाठी देय्य होणार्या मोबदल्याच्या ठिकाणी निवाड्यात उल्लेख करून निवाडा जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित भूधारकाला निश्चित केलेल्या भूखंडाचे वाटपपत्र संपादित जमिनीचा ताबा घेताना देण्यात येईल. या प्रक्रियेनंतर सदरच्या भूखंडाचा भाडेपट्टा करार करण्यात येईल.