नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 68 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रविंद्र इथापे, सरोज पाटील, गणेश म्हात्रे, श्रीम.रुचा पाटील, माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांत महापालिका पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून त्यावर झळकणारे भारतातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर तसेच महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर असे रंगीन विद्युत फलक नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. ही रोषणाई 14 ते 16 ऑगस्ट 2015 या कालावधीत केली जात असून तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी तसेच देशातील सर्वात उंच 225 फूट ध्वजस्तंभावरील प्रतिकचिन्ह स्वरूपातील ध्वजाला मानवंदना देण्यासाठी अनेक नागरिक महापालिका मुख्यालय परिसराला आवर्जून भेट देत आहेत.