मुंबई : 15 ऑगस्ट 1975. यंदा बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या शोले या सिनेमाला तब्बल 40 वर्ष पूर्ण झालीत.
शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला सिनेमा आहे. निर्माता-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेच्या रुपात बॉलिवूडला एक धमाकेदार सिनेमा दिला होता. सिनेमाचे संवाद लेखक जावेद अख्तर यांच्यासोबत सलीम खान यांनी लिहिले होते. या दोघांनी लिहिलेले डायलॉग आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. शोले हा सिनेमा भारतीय सिनेजगतातील मैलाचा दगड ठरलेला सिनेमा आहे. शोलेच्या आसपास कथानक असलेली अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले मात्र शोलेच्या आसपास कोणीच पोहोचू नाही शकले.
40 वर्षांच्या या प्रदिर्घ काळात अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. या सिनेमात काम केलेले अनेक कलाकार आपल्यातुन निघून गेले मात्र त्यांची या सिनेमातील छबी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. जय-वीरु, गब्बर, ठाकूर, सांबा, कालिया, सूरमा भोपाली, बसंती, धन्नो असी सगळी पात्रं या सिनेमात भाव खावून गेली होती. सिनेमातील छोटी-छोटी पात्रंही आजही रसिक विसरु शकलेली नाही. सिनेमा इतका मोठा हिट होईल याची कल्पना सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनीही केली नव्हती. परंतू सिनेमाच्या यशात कलाकारांचंही महत्त्वाचं योगदान असल्याचं रमेश सिप्पींचं म्हणण आहे.
आज आपण शोले सिनेमातील कॅरेक्टरबद्ल जाणून घेणार आहोत.. की अजुनही का या सिनेमातील कॅरेक्टर रसिकांच्या मनात आहे…
** वीरु
अभिनेता धमेंद्र यांनी साकारलेल्या या पात्राने कोणाला हसवलं नाही? त्यांच्या पाण्याच्या टाकीवर चढून म्हटलेला डायलॉग कुद जाऊंगा फांद जाऊंगा आजही रसिकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. धमेंद्रची इमेज खरंतर एक्शन हिरोची. मात्र, शोलेमध्ये धरम पाजींचं वेगळंच रुप रसिकांना बघायला मिळालं. त्याचप्रमाणे बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हा डायलॉग तर आलटाईम हिट झालाय.
** जय
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर अंदाज सिनेमात बघायला मिळाला. अमिताभ यांचे ओळीने सात सिनेमे फ्लॉप झाले होते, त्यामुळे रमेश सिप्पी यांना अनेक जणांनी सल्ला दिला होता की कोणता तरी इस्टॅब्लिश एक्टर सिनेमात घ्यावा. मात्र, सिप्पींनी अमितजींचा आनंदमधील अभिनय आवडला होता. तसचं अमिताभचा जंजीरही नुकताच हिट झाला होता. त्यामुळे त्यांनी जयच्या भूमिकेसाठी अमिताभलाच निवडले.
**तेरा नाम क्या है बसंती?
बसंती
रमेश सिप्पींबरोबर हेमाजींनी सीता और गीता या सिनेमात याआधी काम केले होते. त्यामुळे आपली बसंती हेमामालिनीच असणार हे रमेश सिप्पींनी निश्चित केले होते. सिनेमातील चल भाग धन्नो आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है हा डायलॉग चांगलाच हिट झाला होता. तसेच जब तक है जा मै नाचूंगी या गाण्यावरील हेमाजींच्या नृत्याचीही चांगलीच प्रशंसा झाली होती.
** ठाकूर
अभिनेता संजीव कुमार यांना खर तरं वीरुची भूमिका करायची होती. मात्र, रमेश सिप्पींनी त्यांना कनव्हिंन्स करुन ठाकूरची भूमिका दिली. ठाकूर हे हिंदी सिनेमातील अजरामर पात्रांपैकी एक कॅरेक्टर आहे. सिनेमातील संजीव कुमारांच्या अभिनयाने सगळ्यांचीच वाहवा मिळविली. सिनेमातील त्यांचा ये हात नही फाँसी का फंदा है हा डायलॉग तुफान हिट झाला होता.
*** ये हात मुझे दे दे ठाकूर
** गब्बर
शोले सिनेमातील असं कॅरेक्टर जे भारतीय सिनेमातील अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक आहे. खरंतर या कॅरेक्टरसाठी आधी डॅनीला साईन करण्यात आले होते. मात्र फिरोझ खानच्या धर्मात्मा सिनेमासाठी डॅनीनं शोले सोडला आणि अमजद खानची वर्णी लागली. सिनेमातील अमजद खानच्या अप्रतिम अभिनयाने गब्बरच्या भूमिकेला चार चाँद लावले. अरे ओ सांबा कितने आदमी थे किंवा ये हात मुजे दे दे ठाकूर असे हिट डॉयलॉग अमजद खानच्या तोंडी होते. गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे.
त्याचप्रमाणे सूरमा भोपाली, कालिया, सांबा, मौसी अशी अनेक हिट कॅरेक्टर या सिनेमात होती. असरानी यांनी रंगविलेला अंग्रेजो के जमाने का जेलर तर आजही रसिकांना लोटपोट होऊन हसवितो.
सिनेमाच्या यशात सिनेमाच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे. आर.डी.बर्मन यांच्या संगीताची जादू चांगलीच चालली. एकापेक्षा एक सरस गाणी सिनेमात होती. शोलेचा रिमेक बनविण्याचाही बर्याच जणांनी प्रयत्न केला मात्र त्यांना तोंडघाशीच पडावं लागलं. शोलेचा रिमेक बनविणे केवळ अशक्य आहे. कारण शोलेसारखा सिनेमा पुन्हा होणं शक्य नाही.
शोले हा खर्या अर्थाने क्लासिक सिनेमा असून या सिनेमाला 40 वर्ष पूर्ण झाली तरीही या सिनेमाची क्रेझ अजुनही कायम आहे ही खऱचं अभिमानाची गोष्ट आहे.