बुलडाणा : शेतकर्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे.
कारण, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणार्या शेतकर्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेणं आता कमी खर्चात शक्य होणार आहे. शैक्षणिक शुल्कातील 50 टक्के रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही महत्वपूर्ण घोषणा बुलडाणा येथे केलीय.
बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी राज्य शासनाकडून राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांना शेतीला जोड धंदा करता यावा आणि त्यातून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी 50 टक्के सवलतीने म्हशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर भटक्या जातीतील शेतकर्यांना 90 टक्के सवलतीने शेळ्या, मेंढ्या देण्याचा निर्णय देखील कृषीमंत्र्यांनी जाहीर केला आहे.