*** मुंबई हायकोर्टाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
मुंबई : स्वत:ला अष्टभूजा देवीचा अवतार सांगणारी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँच्या अडचणी वाढल्या असल्या तरी तिला मुंबई हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. हायकोर्टाने राधे माँचा दोन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिंडोशी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने शुक्रवारी वरच्या कोर्टात धाव घेतली होती. अर्जावर सुनावणी झाली आणि तिला कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे.
राधे माँला शुक्रवारी कांदिवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. राधे मॉने पोलिस ठाण्यात हजर झाली. वाळकेश्वर येथील घराकडून कांदिवली पोलिस ठाण्याकडे निघाल्या तेव्हा त्यांच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
एका महिला भक्ताने राधे मॉला कवेत उचलून कारमध्ये बसवले. मात्र, ती गैरहजर राहिल्यास राधे माँला अटक होण्याची शक्यता आधी वर्तवली जात होती.
दुसरीकडे, एका महंताने राधे मॉला आपल्या गुरुच्या हत्येप्रकरणी जबाबदार ठरवले आहे. श्यामसुंदर दास असे महंताचे नाव असून ते राधे माँचे गुरु भाऊ आहे.तसेच राधे माँकडून आपल्याला जिवाला धोका असल्याचेही श्याम सुंदर दास यांनी म्हटले आहे.
*** राधेमाँसह सातही जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा
दोन आठवड्यांपूर्वी कांदिवली परिसरातील निक्की गुप्ता या महिलेने सासरच्या सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळाची तक्रार केली आहे. राधेमाँ हिच्या सांगण्यावरूनच सासरचे लोक आपला मानसिक छळ करत असल्याचा निक्की यांचा आरोप आहे. निक्की यांच्या तक्रारीवरून राधेमाँसह सातही जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यातील पाच आरोपींचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला असून राधे माँ हिला सोमवारी पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यानुसार राधे माँला शुक्रवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राधे माँने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
*** राधे माँ परदेशात पळून जाण्याचा धोका
आपल्यावरचे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार्या राधेमाँ हिचा जामिन कोर्टाने फेटाळला आहे. राधेमाँ हिने पोलिस ठाण्यातील हजेरी टाळण्यासाठी हा जामीन अर्ज केल्याचा मुद्दा निकी गुप्ता हिच्या वकिलांनी मांडला. तसेच राधेमाँ हिला अटकपूर्व जामीन मिळाल्यास ती परदेशात पळून जाण्याचा धोका असल्याकडेही लक्ष वेधले. त्याच बरोबर या प्रकरणी फिर्यादी तसेच इतर पाच आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले असून राधेमाँ हिच्या चौकशीची गरज असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यासाठी तिला शुक्रवारी बोलावण्यात आले असून ही चौकशी 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राधेमाँने केल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायालयाने राधेमाँ हिचा जामीन अर्ज फेटाळला.