सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या हिवताप व संशयित डेंग्यू आजारांचा पारेषण कालावधी असल्याने आरोग्य समितीच्या सभापती सौ. पुनम पाटील यांनी डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामाच्या ठेकेदारांची तसेच त्यांचे तांत्रिक पर्यवेक्षक आणि महानगरपालिकेच्या शहर हिवताप अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर यांचेसह सर्व नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकांची संयुक्त बैठक घेऊन कामात गतीमानता आणण्याचे निर्देश दिले.
यामध्ये सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत अधिक प्रभावी जनजागृती मोहिम राबविण्याकरीता प्रभागांमध्ये तेथील नगरसेवकांचा सहभाग घ्यावा असे सूचित करण्यात आले. दैनंदिन डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण याबाबतची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना आरोग्य विभागामार्फत नियमितपणे कळविण्यात यावी असेही सभापती महोदयांनी सांगितले.
हिवताप व डेंग्यू आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर कार्यवाही गतीमान करावी असे सूचित करतानाच आरोग्य समिती सदस्यांनीही याबाबतची जनजागृती अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सर्व लोकप्रतिनिधींनीही आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरातील व सोसायटीमधील डासउत्पतीस्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आरोग्य समिती सभापती सौ. पुनम पाटील यांनी केले आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात साथीच्या आजाराबाबत दक्ष भूमिका दाखविणार्या आरोग्य सभापती सौ. पूनम पाटील यांच्या जागृत भूमिकेचे नवी मुंबईकरांकडून स्वागत केले जात आहे.