मुंबई : ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर धावणार्या महिला विशेष लोकलमध्ये आता पुरुष प्रवाशांना देखील प्रवेश मिळणार आहे.
महिला विशेष लोकलमधून पुरुषांना प्रवास करता यावा याकरता ४ डब्बे जनरल (पुरुषांसाठी) ठेवण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर धावणार्या चार लोकलपैकी संध्याकाळी ठाण्याच्या दिशेने धावणार्या दोन महिला विशेष लोकलमध्ये या डब्यांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.
सध्या ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल आणि ठाणे-नेरुळ या मार्गावर २१० लोकल धावतात. या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या ही जवळपास २ लाख इतकी आहे. यामध्ये सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर नवी मुंबईतून ठाण्याकडे परतणार्या प्रवाशांची संख्या ही मोठी आहे.
मात्र, सायंकाळी गर्दीच्या वेळी चालवण्यात येणार्या महिला विशेष लोकलमुळे पुरुष प्रवाशांना स्थानकात ताटकळत उभे राहावे लागते. वाशीवरून सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांच्या महिला विशेष लोकलनंतर जवळपास पंधरा मिनिटांनी ठाण्याकरता लोकल सोडण्यात येते.
तर पनवेल स्थानकात सायंकाळी ५ वाजून ४२ मिनिटांच्या महिला विशेष लोकलनंतर ठाणे लोकलसाठी पुरुष प्रवाशांना तब्बल पाऊणतास प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा महिला विशेष लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने या लोकल रिकामी ठाण्याकडे रवाना होतात.
मात्र, गाडी रिकामी असतानाही पुरुष प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे शक्य नसल्याने स्थानकात ताटकळत उभे रहावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत दखल घेण्यात आली असून महिला विशेष लोकलमध्ये ४ डबे पुरुष प्रवाशांकरता खुले करण्यात येणार आहेत.