मुंबई : चीनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबद्दल निर्माण झालेल्या साशंकतेमुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराने मोठी घसरण नोंदवली.
बाजार उघडताच बीएसई सेनसेक्स १००० अंकांनी गडगडून २६ हजारापर्यंत घसरला. आतापर्यंत सेन्सेक्समध्ये १२०० अंकांनी घसरला असून, गुतंवणूकदारांचे तीन लाख कोटींपेक्षा जास्तचे नुकसान झाले आहे. सात वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३५० अंकांची घसरण झाली असून, निफ्टी आठहजारच्या खाली आला आहे. या सर्व घसरणीचा परिणाम रुपयावरही झाला. रुपयाने मागच्या दोन वर्षातील नीचांकी पातळी गाठत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६६.४७ झाली. सप्टेंबर २०१३ नंतर रुपयाने प्रथमच इतकी मोठी घसरण नोंदवली.
चीनी अर्थव्यवस्थेबद्दल जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये साशंकता आहे. जागतिक बाजारात याचे पडसादर उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने आपल्या शेअर बाजाराला सावरण्यासाठी आपल्या चलनाचे अवमूल्यन केले होते.
तेव्हाच चीनच्या आर्थिक स्थितीबद्दल संशय निर्माण झाला होता. आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी अवमूल्यनामुळे चीनच्या आर्थिक क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होत असल्याचे म्हटले होते.