भारताने श्रीलंकेवर २७८ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
सोमवारी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा या दुकलीने श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले. भारताच्या ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा दुसरा डाव फक्त १३४ धावात संपुष्टात आला.
दुसर्या डावात करुणारत्नेचा (४६) अपवाद वगळता अन्य सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसरी कसोटी जिंकून श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराला विजयी निरोप देण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले. दुस-या डावात अश्विनने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला.
अश्विनने सर्वाधिक पाच, अमित मिश्राने तीन तर उमेश यादव आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला. चौथा दिवसअखेर दोन बाद ७२ अशा स्थितीत असणार्या श्रीलंकेच्या उर्वरित आठ फलंदाजांना पाचव्या दिवशी फक्त ६२ धावांची भर घालता आली.
सकाळी पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रविवारच्या धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता मॅथ्यूजच्या रुपाने श्रीलंकेला तिसरा झटका बसला.
उमेश यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलकडे झेल देऊन मॅथ्यूज बाद झाला. त्याने (२३) धावा केल्या. त्यानंतर धोकादायक दीनेश चंडीमलला अमित मिश्राने (१५) धावांवर तंबूत पाठवले.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या थिरीमानेला (११) अश्विनने बदली खेळाडू पूजाराकरवी झेलबाद केले. मुबारक आणि धम्मिका प्रसादला भोपाळाही फोडू न देता अनुक्रमे इशांत आणि अश्विनने बाद केले. त्यानंतर एकाटोकाकडून किल्ला लढवणार्या करुणारत्नेच्या (४६) अश्विनने यष्टया वाकवल्या.
श्रीलंकेच्या शेवटच्या दोन फलंदाजांचा अडसर अमित मिश्राने दूर केला. कौशलला (५) धावांवर मिश्राने पायचीत पकडले. चामीराला (४) धावांवर पायचीत करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.