नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. तर गुणपत्रिकांचे वाटप सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या निकालासोबतच विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून त्याची प्रतही घेता येईल.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आणि अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर् वाया जाऊ नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाने दहावीची तात्काळ फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पाश्वर्र्भूमीवर ही परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्टच्या दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून १ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
निकाल तातडीने लावण्यासाठी शिक्षण मंडळाकडून मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर केवळ २० दिवसांच्या आत निकाल जाहीर करता आला असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
दहावीच्या या परीक्षेसाठी गुणपडताळणीसाठी ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्याची आणि श्रेणीसुधार योजनेचाही लाभ मिळणार आहे.
दहावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने विभागीय स्तरावर हेल्पलाईन नंबरही जारी केले असून यात मुंबईसाठी (०२२)२७९३७५६, २७८८१०७५ व कोकण विभागीय मंडळासाठी (०२३५२)२३१२५०,२२८४८० या हेल्पलाइनवर संपर्क करता येईल.