** मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आ. मंदाताई म्हात्रेंची राष्ट्रवादी काँग्रेसला चपराक !
** महापालिका मुख्यालयात युतीच्या नगरसेवकांकडून आ. मंदाताई म्हात्रेंचा सत्कार !
** किमान तीन प्रभाग समित्यांवर आता युतीचा भगवा फडकणार!
** अनंतकुमार गवई
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेमध्ये गत 20 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने विरोधी पक्षांना विश्वासात न घेता मंजूर केलेले प्रभाग समिती रचना ठराव अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केला आहे. सदर सभेच्या वेळी विरोधी पक्षांनी विरोधी पक्षातील शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी महासभेत महापौरांविरोधात घोषणाबाजी याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तसेच प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार केला होता.
महानगरपालिकेच्या तिसर्या सभागृहातदेखील स्पष्ट बहूमताच्या पाठबळावर सभागृहात तब्बल वर्षभर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या विकासकामाचे प्रस्ताव फेटाळण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला होता. 20 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये पिठासन अधिकारी असलेले महापौर सुधाकर सोनवणे तसेच महापालिकेच्या प्रभारी सचिव चित्रा बाविस्कर यांनी तातडीने कामकाज म्हणून प्रभाग समिती रचना ठराव विरोधी पक्षांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेताच सभागृहात मंजुरीसाठी आणला. सचिव चित्रा बाविस्कर यांनी विरोधी पक्षांची मंजुरी न घेताच तातडीचा प्रस्ताव सभागृहाच्या विषय तालिकेवर ठेवला. या प्रस्तावाला विरोधी पक्षांची हरकत असूनही तो सभागृहात मतदानाला टाकला गेला नाही. अन् विरोधकांचा आक्षेप झुगारुन या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा पध्दतीने सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने त्याने सदस्यांसह सभागृहाचीही दिशाभूल झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी त्यावेळी केला होता. वास्तविक पाहता ऐरोली विधानसभा मतदार संघातील 3 प्रभाग समितींमध्ये शिवसेनेची सत्ता येणार होती. मात्र, याच कारणास्तव सत्ताधार्यांच्या इशार्यावरुन सदर प्रभाग समितींमध्ये फेरबदल करुन त्याचा प्रस्ताव सचिव चित्रा बाविस्कर यांनी विरोधी पक्षांना न देता तो सरळ तातडीचा प्रस्ताव करुन महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला. त्यामुळे महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या या मनमानी कारभाराविरोधात महापालिकेतील विरोधी पक्षांतील शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी 21 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात काळ्या टोप्या घालून आणि काळ्या फिती बांधून आंदोलन छेडले. यावेळी आंदोलनकर्त्या शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्त तसेच सचिव कार्यालयाबाहेर बाविस्कर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बाविस्कर यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन देऊन प्रभारी सचिव चित्रा बाविस्कर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, सदर प्रस्तावावर आयुक्तांचीही सही झाली असल्याने कारणाने प्रभाग समिती रचना ठराव रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांना सांगण्यात आले.
अखेरीस बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी 24 ऑगस्ट रोजी सदर प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी नेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित महापालिकेच्या सदर ठरावाला स्थगितीचे आदेश दिले आहेत. परिणामी, मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला चांगलीच चपराक बसली असून ऐरोली विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षातील शिवसेना-भाजपाची दोन-तीन प्रभाग समित्यांवर सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे.
त्यानुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी, 24 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विरोधी पक्षातील नगरसेवकांना विश्वास न घेता मंजूर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईने मंजूर केलेला प्रभाग समिती रचना ठराव रद्द करण्यासाठी निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सदर प्रभाग समिती रचनेच्या ठरावाला त्वरित स्थगितीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या स्थगिती आदेशामुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला चपराक बसली असून महापालिकेअंतर्गत 3 प्रभाग समित्यांवर शिवसेना-भाजपाची सत्ता येणार असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांकडून प्रभाग समिती रचनेच्या प्रस्तावावर स्थगिती आणल्याबद्दल महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह शिवसेना- भाजपाच्या नगरसेवकांनी आ. मंदाताई म्हात्रे यांचे जाहिर अभिनंदन केले.