मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी न लावल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमधील पाण्याचा साठा आटत चालला आहे. त्यामुळे आता वर्षभराचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. मुंबईतील या पाणीकपातीसह ठाण्याला देण्यात येणारे पाणीही कमी करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत होणार आहे.
ऑगस्ट महिन्यातच पावसाने विश्रांती घेत घालवल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता चांगलीच वाढली आहे. तलाव क्षेत्रात पाऊस पडत नसल्यामुळे तलावातील पाण्याची पातळीत वाढ नाही. परिणामी वर्षभराच्या पाण्याचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न महापालिकेपुढे असून तीन महिने कोणताही पाणीकपातीचा निर्णय न घेणार्या महापालिकेने आता कपात करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
यासाठी २० टक्के सरसकट पाणीकपात केली जाणार आहे. जलअभियंता विभागाने अभ्यास करून कपात करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यावर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी शेरा मारला असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे गेला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या मंजुरीनंतर येत्या बुधवारी स्थायी समितीपुढे पाणीकपातीचा प्रस्ताव मंजुरीला येत आहे. यामध्ये कपातीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महापालिकेला जे पाणी पुरवण्यात येते, त्यातही कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे येत्या बुधवारी २० टक्के पाणीकपातीचा निर्णय झाल्यास गुरुवारपासून मुंबईकरांना होणारा पाण्याचा पुरवठा आता कमी होणार असून या कपातीमुळे शेवटच्या टोकाला असलेल्या वस्त्या आणि डोंगराळ वस्त्यांमध्ये पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.