अनंतकुमार गवई
नवी मुंबई : आगरी-कोळी भवनाची निर्मिती ही स्थानिक आगरी-कोळी समाजासाठीच झालेली आहे. या भवनातील ७० टक्के तारखा या आगरी-कोळी समाजाला आणि उर्वरित ३० टक्के तारखा या उर्वरित समाजाला देण्याची आग्रही मागणी सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी दिली.
आगरी-कोळी भवनातील कार्यक्रमाच्या तारखा व अन्य असुविधांबाबत नेरूळ, करावे, दारावे, जुई, शिरवणे, सारसोळे येथील ग्रामस्थांनी नामदेव भगत यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचल्यावर नामदेव भगत यांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी आगरी-कोळी भवनाला भेट दिली.
आगरी-कोळी समाज प्रथम विवाह ठरवितो आणि नंतर हॉल पहाण्यासाठी सुरूवात करतो. अन्य समाजाची माणसे प्रथम हॉल पाहतात आणि त्या उपलब्ध तारखेनुसार विवाहाची तारीख ठरवितात. त्यामुळे त्यांना स्थानिक आगरी-कोळी समाजाला विवाहासाठी आगरी-कोळी भवनाच्या तारखा उपलब्ध होत नाही आणि अन्य समाजबांधवांना तारखा उपलब्ध होतात. त्यामुळे या भवनाला आगरी-कोळी नाव असूनही आपणास भवन उपलब्ध होत नसल्याची नाराजी आगरी-कोळी समुदायामध्ये वाढीस लागली आहे. त्यामुळे तारखांचे नियोजन करताना ७० टक्के तारखा आगरी-कोळी समाजाकरता आणि उर्वरित ३० टक्के तारखा अन्य समाजबांधवांना उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी या बैठकीत नामदेव भगत यांनी केली.
आगरी-कोळी भवनामध्ये कोणाही ठराविक डेकोरेटर्स, कॅटरर्सची मोनोपाली असता कामा नये. यामुळे ग्राहक भरडला जातो. अन्य ठिकाणी हॉल तात्काळ भेटत नसल्याने या एकाधिकारीशाहीला ग्राहक बळी पडून महागाईत तो भरडला जातो. त्यामुळे डेकोरेटर्स आणि जेवणाचे दरही सिडकोने निश्चित केल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होवून अधिकाधिक ग्राहक आगरी-कोळी भवनाकडे आकर्षित होतील. मोनोपॉलीमुळे सर्वसामान्य जेवणाची थाळी ६० ते ८० रूपयामध्ये भेटत असतानाही कॅटरर्सवाले १६० ते १८० रूपये दराने विकतात आणि विवाहाचे कार्यक्रम अधिक खर्चिक होत असल्याचे नामदेव भगत यांनी चर्चेदरम्यान सिडको अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आगरी-कोळी भवनातील अन्य सुविधांबाबत, तेथील सफाई कामगारांच्या समस्यांबाबत त्यांनी संबंधिताशी चर्चा करून याबाबतची आगामी बैठक लवकरच सिडको कार्यालयात आयोजित करून स्थानिक आगरी-कोळी बांधवांच्या या भवनातील समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे श्री. नामदेव भगत यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
आगरी-कोळी भवनात पाहणी करून त्यातील अन्य समस्यांची तड लवकरात लवकर लावण्याची मागणी त्यांनी सिडको अधिकार्यांकडे केली.