नवी दिल्ली : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो कांद्याचा भाव 50 रुपयांपेक्षा खाली आला आहे.
निर्यातीवर नियंत्रण आणि साठेबाजांवर कारवाईची भिती यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून कांद्याचे नवे पीक आल्याने दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्येही प्रतिकिलो कांद्याचे दर तीन ते पाच रुपयांनी कमी होऊन 53 रुपये झाले आहेत.
मात्र देशभरातील किरकोळ बाजारात 80 रुपये प्रतिकिलो कांद्याची किंमत कायम आहे. देशभरातील कांद्याच्या किंमतीची दिशा ठरवणार्या लासलगावमध्ये प्रतिकिलो कांद्याचा दर 48 रुपये झाला आहे. मागच्या आठवडयात हाच दर 57 रुपये होता.
कांद्याची आवक वाढल्याने घाऊक बाजारात हे दर कमी झाले आहेत. सरकारने परदेशातील कांद्याच्या विक्रीवरील निर्यात मूल्य 425 डॉलरवरुन 700 डॉलरपर्यंत वाढवल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे.
सोमवारी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला साठेबाजांवर कारवाई करुन आवश्यक उपायोजना करण्याची सूचना केली होती. देशभरात पाच लाख टन कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
अपुर्या पावसामुळे खरीपाच्या पिकावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने कांद्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून कांद्याचे पीक आल्याने येणार्या दिवसांमध्ये पुरवठा वाढेल आणि किंमती नियंत्रण रहातील अशी अपेक्षा आहे.