* शिवसेनेच्या सोमनाथ वासकरांकडून कळवा-बेलापुराचा मुद्दा! * राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश म्हात्रेंकडून अतिक्रमण घोटाळ्यातील नगरसेवकाचे स्मरण! * शिवसेनेच्या एम.के.मढवींना आमदार संदीप नाईकांची आठवण! * सदस्यांच्या वर्तनाबद्दल महापौरांनी दिली अखेरीस तंबी!
*** अनंतकुमार गवई ***
नवी मुंबई : विकासकामांना आर्थिक निधी नसल्याने नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे आर्थिक निधीच उपलब्ध नाही. तिजोरी रिकामी पडली आहे, यावर तोडगा काढण्यासाठी महापौर सुधाकर सोनवणे यांनी बोलविलेल्या विशेष महासभेत आर्थिक चर्चेएवजी सत्ताधार्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर परस्परावर चिखलफेक करण्यातच विशेष स्वारस्य असल्याचे सलग दुसर्या दिवशीही नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाले.
आरोप-प्रत्यारोपांमध्ये कळवा-बेलापुर बँकेचा मुद्दा, अतिक्रमण घोटाळा आणि अटक झालेलेे नगरसेवक, आमदार संदीप नाईकांमुळे दिलेला राजीनामा आदी चिखलफेकीतील मुद्दे पाहता सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना नवी मुंबईच्या विकासाबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दोन दिवसातील महासभेतील चर्चेवरून नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाले आहे. महापालिकेची आर्थिक स्थितीवरील चर्चा न होता परस्परांवर होत असलेली चिखलफेक आणि माफी मागण्यावरून सभागृहाचा वाया गेलेला वेळ यामुळे नवी मुंबईकरांनी नवी मुंबईचा कारभार चालविण्यासाठी सूत्रे कोणाच्या हाती सोपविली आहेत याचाच दोन दिवसातील महासभेतील कामकाजावर लक्ष घातल्यावर त्यांना जवळून पहावयास मिळाले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात महापौर सुधाकर सोनवणे यांनी मंगळवारीदेखील सलग दुसर्या दिवशी बोलावलेली विशेष महासभा देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजली. नवी मुंबईच्या सुविधांबाबत, विकासाबाबत नवी मुंबईकरांनी निवडून दिलेले नगरसेवक गंभीर नसल्याचा संदेश नवी मुंबईकरांमध्ये दोन दिवसातील कामकाजामुळे गेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत प्रशासनाला घेरताना भाजपाचे तुर्भेतील नगरसेवक रामचंद्र घरत यांनी निवडणुकीपूर्वी 1300 कोटींची कामे काढण्यात आल्याने आज महानगरपालिकेला ठेकेदारांचे पैसे देता येत नाहीत. त्यामुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काढण्यात आलेल्या सर्व कामांची विशेष समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपा नगरसेवक रामचंद्र घरत यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच सल्लागाराची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फरक असून शिवसेनेत एक से बढकर एक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सब का मालिक एक है, असे बोलून अनंत सुतार यांनी सभागृहातील कामकाजादरम्यान विरोधकांना टोमणा मारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापालिका प्रशासनाला काही सूचना केल्या. महापालिकेच्या काही विभागांमध्ये भ्रष्टाचार असून त्या विभागांचे थर्डपार्टी ऑडिट करण्याची नगरसेविका गायकवाड यांनी मागणी केली. तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर, जाहिरात धोरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादन करुन त्यांनी महापालिकेला खाजगी वित्तीय सल्लागाराची गरज असल्याचे सांगितले.
महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना शिवसेनेचे सानपाड्यातील नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी कळवा-बेलापूर बँकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी शिवसेनेवर पलटवार करीत अप्रत्यक्षपणे नगरसेवक एम. के.मढवी यांच्यावर टिका केली. महानगरपालिकेत झालेल्या कथित अतिक्रमण घोटाळ्यानंतरही महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली होती. तर यात एका नगरसेवकाला अटकही झाल्याचे गणेश म्हात्रे सभागृहात म्हणाले. त्यावरुन सत्ताधारी राष्ट्रवादीचे आणि विरोधी गटातील शिवसेना-भाजपाचे नगरसेवकांनी सभागृहात गदारोळ केला.
नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी सभागृहात माफी मागण्याबाबत विरोधक कमालीचे आक्रमक झाले. त्याचवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी यांनी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्यामुळेच आपल्याला राजिनामा द्यावा लागल्याचे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. यादरम्यान नगरसेवक एम. के. मढवी आणि स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. परिणामी, सभागृहातील वातावरण आणखीनच संतप्त बनले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांच्या विरोधात सभागृहामध्ये हाय- हायच्या घोषणा दिल्या. तसेच सभागृहात केलेल्या आमदार संदीप नाईकांसदर्भातील वक्तव्याबाबत एम. के. मढवी जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही बसणार नाही असा त्यांनी पावित्रा घेतला.
महापौर सुधाकर सोनवणे तसेच सभागृह नेते जयवंत सुतार यांनी देखील एम. के. मढवी यांना सभागृहात माफी मागण्यास सांगितले. त्यावर आधी तुम्ही सभागृहातील रेकॉर्डींग चेक करावे. यात मी दोषी असल्यास वाटेल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे मढवी यांनी सांगितले. अखेर महापौर यांनी या विषयावर पडदा टाकत सर्वच सदस्यांना पुन्हा सभागृहात असे वर्तन न होण्याबद्दल तंबी दिली.
सभागृहात दोन दिवस चाललेल्या या विशेष महासभेत नवी मुंबईच्या विकासाऐवजी आरोप-प्रत्यारोपांवर भर दिल्याने नवी मुंबईकरांनाही सभागृहात कोणत्या नगरसेवकांना पाठवावे याबाबत आत्मपरिक्षणाची संधी यानिमित्तानेे अनायसे उपलब्ध झाली आहे.