*** अनंतकुमार गवई ***
नवी मुंबई ः स्वमालकीचे धरण असल्याचा टेंभा मिरविणार्या नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मात्र नवी मुंबईचे टोक असणार्या ऐरोली परिसरात आजही अनियमित पाणी पुरवठा होत आहे. ऐरोलीतील रहीवाशांना धरण उशाला, कोरड घशाला असा अनुभव पिण्याच्या पाण्यासाठी येत असल्याने ऐरोलीमधील रहीवाशांनी थेट महानगरपालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयावरच धडक देत कार्यालयाबाहेर बाहेर रिकाम्या घागरी नेत अभिनव आंदोलन करत पाणी पुरवठ्याबाबत महापालिका अधिकार्यांना जाब विचारला. या आंदोलनात शिवसेना नगरसेविका कुंदा काटे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीतील महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.
गेल्या काही महिन्यापासून होत असलेल्या ऐरोलीतील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिका अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करुन देखील रहीवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर नगरसेविका कुंदा काटे यांनी मंगळवारी, दि.25 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढून पाण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात नगरसेविका काटे यांच्यासह शिवसेना नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक राजू पाटील यांच्यासह ऐरोली परिसरातील शेकडो महिला-पुरुष सामील झाले होते.
मोरबे धरण तयार झाल्यावर महानगरपालिकेने 220 कोटी रुपये खर्चुन नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. स्काडासारखी अत्याधुानिक प्रणाली वापरुन नवी मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा करण्याची वल्गना महापालिका प्रशासनाने केली. मात्र, महानगरपालिकेकडून ऐरोली वसाहतीमध्ये आजही अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे.
आंदोलनकर्त्या शिवसेनेच्या रणरागिनींनी ऐरोलीतील अनियमित पाणी पुरवठ्याचा जाब महानगरपालिका अधिकार्यांना विचारला. ऐरोली वसाहतीअंतर्गत असलेल्या जलवाहिन्या सिडकोने टाकून पस्तीस वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे आजमितीस या जलवाहिन्या गंजल्या आहेत. गंजलेल्या जलवाहिन्यांमुळे ऐरोलीतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने ऐरोलीतील जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, असे त्रस्त आंदोलनकर्त्यांनी महापालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने ऐरोली वसाहतीमध्ये होणार्या अनियमित पाणी पुरवठ्याच्या समस्येवर लवकर तोडगा काढला नाही तर पाण्यासाठी महापालिकेविरुध्द आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नगरसेविका कुंदा काटे यांनी दिला आहे.
ऐरोली परिसरात सदोष जल वितरण व्यवस्थेमुळे अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने जनतेला गेल्या काही महिन्यापासून पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत, अशी माहिती नगरसेवक मनोज हळदणकर यांनी दिली.