नवी मुंबई : श्री गणेशोत्सव 2015 च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपआयुक्त शहाजी उमप व वाहतुक पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांचेसोबत परिमंडळ उपआयुक्त सुभाष इंगळे व सुरेश पाटील यांचेसह सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, विभाग अधिकारी यांचेसोबत 24 ऑगस्ट रोजी झालेल्या श्री गणेशोत्सव पुर्वतयारी आढावा बैठकीत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली होती.
बुधवारी, दि. 26 ऑगस्ट रोजी याच अनुषंगाने पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी गणेशोत्सवाशी संबंधित महापालिका व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन गणेशोत्सव सुनियोजित पध्दतीने साजरा होण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या.
यामध्ये मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे श्री गणेशोत्सव मंडळांनी स्टेज, मंडप उभारण्याची कार्यवाही करावयाची आहे अशाप्रकारे मंडळांना आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंडळांनी मंडप, स्टेज उभारताना 75 टक्के रस्ता वाहतुकीला खुला राहील याची काळजी घ्यावयाची असून पदपथ रहदारीला खुले राहतील याचीही खबरदारी घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे मंडप, स्टेज, कमानी उभारताना रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्यावयाची आहे. खांब रोवण्याकरीता वाळुच्या ड्रम्सचा वापर करावयाचा आहे. मंडपापासून 15 मीटर इतक्याच परिसरात कमान असावी व त्यावर वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती असू नयेत. उभारले जाणारे मंडप, स्टेज यांचे स्थैर्य, मजबूती योग्य असल्याचे सक्षम प्रमाणपत्र मंडळाकडे असणे गरजेचे असून याबाबतची संपूर्ण जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांची असणार आहे.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना उत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत सुलभता यावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई यांचे वतीने संयुक्तरित्या एक खिडकी संकल्पना राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील कक्षामार्फत महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन, एमएसईडीसी यांचे अधिकार्यांमार्फत एकत्रितरित्या पाहणी करून परवानगी दिली जाणार आहे.
यामध्ये समन्वयाच्या दृष्टीने परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त शहाजी उमप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गणेशोत्सव मंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येत असून विभाग अधिकारी स्तरावरदेखील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचेसमवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्व गणेशोत्सव मंडळांना नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, मंडळांनी रितसर परवानगी घेऊनच श्री गणेशोत्सवाचे मंडप, स्टेज, कमानी उभाराव्यात, देखावे – सजावटी यांचे सादरीकरण नैतिक मूल्यांचे व सामाजिक एकता व संस्कृतीचे जतन करणारे असावे, अधिकृत वीज कनेक्शन घेण्यात यावे, ध्वनी प्रदूषण अधिनियम व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, श्रीगणेशमुर्तींची, मंडपाची व परिसराची सुरक्षा (सीसीटीव्ही लावणे, आवश्यक स्वयंसेवक व्यवस्था ठेवणे इ.) तसेच गर्दीचे नियोजन करण्याची काळजी घ्यावी, मंडपाचे ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनरेटर, अग्निशमन यंत्रे आदी उपाययोजना करण्यात यावी, श्रीगणेश मुर्तींचे आगमन – विसर्जन सुव्यवस्थित रितीने करता यावे, यादृष्टीने श्रीगणेशमुर्तींची उंची व वजन मर्यादीत ठेवणेबाबत काळजी घेण्यात यावी तसेच ज्या ठिकाणी श्रीमुर्तींचे विसर्जन करणार त्या विसर्जनस्थळाची माहिती संबंधित विभाग कार्यालयास देण्यात यावी.
तरी सर्व श्रीगणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगी घेऊन कायदा व सुव्यवस्थेची जपणूक करीत सुनियोजितरित्या श्रीगणेशोत्सव आयोजन करून नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई यांस संपुर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या वतीने करण्यात येत आहे.