अमरावती : शाळेत जाणार्या मुलाच्या अपघाती मृत्यूने अमरावतीच्या माहुली जहागीर गावामध्ये तणाव निर्माण झाला आहे. सध्या या गावामध्ये मोठया प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सकाळी शाळेत निघालेला साहिल डायरे हा मुलगा अपघाताने एसटीच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. साहिलच्या मृत्यूने चिडलेल्या संतप्त ग्रामस्थांनी एसटी बस पेटवून दिली. एसटी बस पेटवल्याची माहिती मिळताच नांदगावपेठच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
संतप्त ग्रामस्थांनी अग्निशमन दलाची गाडीही पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही गावात दाखल झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
त्यानंतर संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या तिवसाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांनाही धक्काबुकी करण्यात आली. सध्या माहुली जहागीर गावामध्ये तणावाची स्थिती असून, गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात आहे. बारा वर्षांचा साहिला अमरावतीच्या ज्ञानमाता विद्यालयात सातव्या इयत्तेत शिकत होता.