* सात वर्षाच्या ऑडिट प्रकरणावरून विरोधकांचा गोंधळ
* महापौरांनी खडे बोल सुनावल्यावर गोंधळी विरोधकांमध्ये शांतता
**** अनंतकुमार गवई
नवी मुंबईः महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वीच एलबीटी रद्द केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या जमा-खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सोमवारी (दि. 24 ऑगस्ट) बोलविण्यात आलेल्या विशेष महासभेत जमा-खर्चाच्या सादरीकरणावरुन विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी याप्रकरणी वित्त-लेखा विभागाने सादरीकरण करण्याऐवजी माहिती पुस्तिका काढणे गरजेचे असल्याने ती महापालिका प्रशासनाने न काढल्याबद्दल तसेच गेल्या 7 वर्षांची बलेन्स शिट प्रमाणित न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एलबीटी रद्द झाल्याने सध्या नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. त्यातच एप्रिल 2015 ची नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्यांकडून गतवर्षत करोडो रुपयांची कामे काढण्यात आली. त्यामुळे आजमितीस महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सदस्यांनी विशेष सभेची मागणी केल्यावर महापौर सुधाकर सोनावणे यांनी 24 ऑगस्ट रोजी विशेष
महासभा बोलावली. सभेच्या सुरुवातीला मनपा सभागृह नेते जयवंत सुतार यांनी ठरावाची सूचना मांडली. राज्य शासनाकडून 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सन 2015-16 या आर्थिक वर्षाच्या मंजूर अर्थसंकल्पातील जमेची बाजु साध्य होण्याची सूतरामही शक्यता नाही.
महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि पुर्तता करावयाच्या नागरी सुविधा यांचा ताळमेळ राखणे गरजेचे आहे. त्यासाठी सखोल चर्चा करण्यात यावी आणि योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी जयवंत सुतार यांनी महासभेत आपली भूमिका स्पष्ट करताना केली. त्यावर महापौर सोनवणे यांनी महापालिकेचे मुख्य लेखा-वित्त अधिकारी गरड यांना जमा-खर्चाचा गोषवारा सभागृहात मांडण्यास सांगितले. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेची केवळ सन 2009-10 पर्यंतची बॅलेन्स शिट तयार असून, 2013-14 पर्यंतचे ऑडिट देखील काही प्रमाणात तयार आहे, अशी माहिती मुख्य लेखा अधिकारी गरड यांनी सभागृहात दिली. त्यावर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मागील सर्व 7 आर्थिक वर्षांचे ऑडीट झाले का याची माहिती विचारुन गोंधळ घातला. तसेच सर्टिफाय ऑडीट कोणी केले? आदि प्रश्न विचारले. यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विविध प्रश्न विचारुन सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच सभागृहाचा एक तास वाया गेला.
अखेर मुख्य लेखा-वित्त अधिकारी गरड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच अधिकार्यांना वेठीस न धरता मी सदर सभा लावली असल्याने माझ्याशी बोला असे खडे बोल महापौर सुधाकर सोनवणे यांनी सुनावल्यावर सभागृहातील विरोधी पक्षाचे नगरसेवक शांत झाले.
दरम्यान, सदर विषयावरील चर्चेत विजय चौगुले यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील, एम. के. मढवी, किशोर पाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार, अशोक गुरखे, रविंद्र इथापे, काँग्रेसच्या अंजली वाळूंज आदिंनी सहभाग घेतला.