* नगरसेवक शंकर मोरेंचा जनहितैषी स्तुत्य उपक्रम
* कापडी पिशव्यांचे घरोघरी मोफत वितरण
* अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील प्रभाग ४६ मध्ये स्वच्छता अभियानातून आरोग्यविषयक जनजागृती अभियान राबवण्यात आले. साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका व स्थानिक नगरसेवकाच्या माध्यमातून हा उपक्रम झाला. त्यामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाने दडी मारल्याने साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास होऊन नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. घरात अथवा घराबाहेर मोकळ्या जागेत साचलेले पाणी, कचरा यामुळे शहरावर हे आरोग्याचे संकट आले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत झालेल्या दुर्लक्षामुळे अनेकजण तापाने फणफणले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती महत्त्वाचे असल्याचे जाणून नगरसेवक शंकर मोरे यांनी महापालिकेच्या माध्यमातून रविवारी प्रभागात स्वच्छता अभियान राबवले. त्यामध्ये पुरुष-महिलांसह ज्येष्ठांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. या अभियानादरम्यान नागरिकांना डासांची पैदास टाळण्यासाठी घ्यायच्या, खबरदारीची देखील माहिती देण्यात आली. तर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी घरोघरी कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. भाजी खरेदीसाठी गृहिणींकडून वापल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरानंतर रस्त्यावर इतरत्र टाकल्या जातात. याच पिशव्या गटार, नाल्यात अडकल्यानंतर पाणी तुंबण्याची शक्यता असते. यामुळे उद्भवणारे संकट टाळण्यासाठी गृहिणींना कापडी पिशव्यांचे वाटप केल्याचे नगरसेवक शंकर मोरे यांनी सांगितले.
त्याशिवाय आरोग्य तपासणी शिबिरातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हे शिबिर भरवण्यात आले होते. त्यामध्ये रक्त तपासणी करून संशयित मलेरिया अथवा तापाच्या रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक शंकर मोरे, पालिका विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील, माजी नगरसेविका चंद्रभागा मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.