एकाद्याच्या नशिबात जे लिहीलेले असते, ते त्याला आज ना उद्या मिळतेच, त्यात कितीही विघ्ने आली तरी त्या विघ्नांवर मात करून नशिबातील भाग्योदय हा अटळ असतोच, याचा प्रत्यय आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उच्चसुशिक्षित नगरसेविका ऍड. सपना गावडे-गायकवाड यांना नक्कीच येत असणार. २००५ साली चालत आलेली निवडणूक लढविण्याची संधी वय कमी असल्यामुळे हूकली. १० वर्षाने ती संधी पुन्हा चालून आली आणि जनतेने या संधीचे मतदानातून सोने केल्यामुळे आज ऍड. सपना गावडे-गायकवाड नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती म्हणून वावरताना पहावयास मिळत आहे.
ऍड. सपना गावडेंना राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा हा अनुवंशिक स्वरूपात मिळालेला आहे. युवावस्थेपासूनच वयापासून ऍड. सपना गावडे या राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संलग्न आहेत. ऍड. सपना गावडे या सहकारक्षेत्रातील महारथी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोकशेठ गावडे आणि माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे यांच्या द्वितीय कन्या. आई-वडीलांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या एक दशकापासून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात वावरत आहेत.
२००५साली झालेल्या महापालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाकडून नेरूळ सेक्टर २८ प्रभागातून सपना गावडे यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारणा झाली होती. तथापि निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असणार्या वयोमर्यादेला ६ महिने कमी पडल्याने सपना गावडे यांना निवडणूक लढविणे शक्य झाले नाही. हा प्रभाग महिला राखीव असल्याने सपना गावडे यांच्या मातोश्री सौ. निर्मला अशोक गावडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. या परिसरात अशोकशेठ गावडेंचा असलेला जनसंपर्क आणि सामाजिक कार्य यामुळे सौ. निर्मला गावडे या नगरसेविका बनण्यात अडथळे निर्माण झाले नाहीत. २०१० साली झालेल्या महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत हा प्रभाग पुरूष खुल्या गटासाठी निवड झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रभागातून खुद्द अशोकशेठ गावडेंसारखा दिग्गज मोहरा निवडणूक रिंगणात पणाला लावला. अशोकशेठ गावडे या निवडणूकीत दणदणीत विजयी झाल्याने सपना गावडेंच्या नशिबी त्याही वर्षी महापालिका सभागृहात जाण्याचा योग आला नाही.
प्रभाग पुर्नरचनेत अशोक गावडे यांच्या प्रभागाचे दोन प्रभागात रूपांतर झाले. गावडे दांपत्याचा हा परिसर बालेकिल्ला असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका प्रभागातून अशोकशेठ गावडेंना तर दुसर्या प्रभागातून ऍड. सपना गावडेंना निवडणूक रिंगणात उतरविले. प्रभाग ९८ मधून निवडणूक लढविणार्या सपना गावडेंच्या प्रभागात ९९८३ लोकसंख्या तर मतदारसंख्या ६०००च्या वर होती. सेक्टर २२,२६,२८,४०,४२ परिसराचा या प्रभागात समावेश होत असून श्रीगणेश सोसायटी व सभोवतालच्या परिसरात गावडे दांपत्यांचा घरटी जनसंपर्क दशकभरापासून असल्याने ऍड. सपना गावडेंना विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. ७०० हून अधिक मतांची आघाडी घेवून ऍड. सपना गावडे महापालिका सभागृहात दाखल झाल्या आहेत.
राजकारणात सुशिक्षित माणूस आल्यावर प्रशासनदरबारी कामाचा पाठपुरावा होणारच हे स्वाभाविक आहे. नगरसेविका झाल्यावर ऍड. सपना गावडे यांनी सर्वप्रथम प्रभागातील रहीवाशांकरता ‘आरोग्यम् धनसंपदा’ अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त करत तो प्रत्यक्षात अंमलबजावणीतही आणण्यास सुरूवात केली. गृहनिर्माण सोसायट्यांकरता कचराकुंड्यांचे वितरण करणे, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, नेत्रचिकीत्सा शिबिराचे आयोजन करणे, साथीच्या आजाराचा उद्रेक होवू नये यासाठी डेंग्यू, मलेरिया रोगाबाबतची जनजागृती शिबिरातून करणे, रक्ततपासणी करणे, गृहनिर्माण सोसायट्यांतील सफाईला प्राधान्य देणे आदी गोष्टींवर ऍड. सपना गावडेंनी प्रारंभापासून भर दिलेला आहे.
ऍड. सपना गावडेंच्या प्रभागात काही ठिकाणी सिडकोच्या भुखंडावर अनधिकृत झोपड्यांमुळे बकालपणा आहे. रहीवाशांना त्रास होवू नये म्हणून काही अविकसित व बकाल भुखंडाची ऍड. सपना गावडेंनी स्वखर्चातून सफाई करून घेतली आहे. काही भुखंडावर स्थानिक रहीवाशांकरता लोकोपयोगी कार्यक्रम करता यावे संबंधित भुखंडाचे सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरण करावे याकरता ऍड. सपना गावडेंनी प्रशासनदरबारी चपला झिजविण्यास सुरूवात केली आहे.
ऍड. सपना गावडेंवर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वास दाखवित उद्यान व शहर सुशोभीकरण समितीचे सभापतीपद सोपविले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्राचा ऍड. सपना गावडेंना अनुभव आहे. कायद्याच्या त्या अभ्यासक आहे. प्रभाग ९८मधील मतदारांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. सिडकोच्या अविकसित व बकाल भुखंडाचे प्रभागाला ग्रहण लागले आहे. त्या ग्रहणातून प्रभागाची मुक्तता करून प्रभागाला स्वच्छ करण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची झालेली पिछेहाट लक्षात घेवून संघटनात्मक पातळीवर ठोस प्रभावी कार्य करून जनाधार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळवावा लागणार आहे. आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा वापर करून आपल्या प्रभागाचा कसा विकास ऍड. सपना गावडे करतात याचे उत्तर आपणास नजीकच्या भविष्यात पहावयास मिळणार आहे.