* महापालिकेचा कारभार मनमानी – विजय चौगुले
* कार्यक्रम लांबल्याने काही भाषणांना फाटा – महापौर
* आमदारांच्या अवमानप्रकरणी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडणार – आ. मंदाताई म्हात्रे
अनंतकुमार गवई
ऐरोली ः नवी मुंबई महापौर श्रीगणेशदर्शन स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याला वादाचे गालबोट लागले आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांचे नाव असल्याचे निमित्त या वादाला कारणीभूत ठरले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे विरुध्द माजी मंत्री लोकनेते गणेश नाईक यांचे राजकीय वैर सार्या नवी मुंबई शहराला माहिती आहे. या वादामुळे आता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या इशार्यांनी नवी मुंबई महापालिकेवर हक्कभंगाची तलवार लटकत आहे.
नवी मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रथमच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस या पक्षांचे नेते एकाच व्यासपिठावर विराजमान झाले होते. या सोहळ्यात माजी मंत्री गणेश नाईक, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, खासदार राजन विचारे, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी एकच व्यासपिठावर उपस्थित होते. सर्वच राजकीय विरोधक एका व्यासपिठावर असल्याने काहीतरी वेगळे घडणार याची चर्चा कार्यक्रमात राजकीय कार्यकर्ते करीत होते. महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकारी देखील व्यासपिठावर असल्याने व्यासपिठावर नेत्यांची गर्दी होती.
अखेर भाषणाच्या राजकीय शिष्टाचाराच्या मुद्यावर या पुरस्कार सोहळ्यात राजकीय वादंग माजले. गणेश नाईक, सुधाकर सोनवणे, राजन विचारे आदिंची भाषणे झाल्यावर मुख्य सोहळा आटोपल्यावर कार्यक्रम आवरता घेण्यात आला. त्यामुळे आ. सौ. मंदाताई म्हात्रे संतप्त झाल्या. या सोहळ्यात भाषण करण्याची संधी दिली नाही म्हणून आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या आवारातच महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका प्रशासनाची हजेरी घेतली. तसेच भाषणाची संधी नाकारुन आमदारांचा अवमान केला म्हणून येत्या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात नवी मुंबई महापालिकेवर हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचा
ईशारा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिला. तर महापौर सुधाकर सोनवणे यांनी कार्यक्रम खूप लांबल्याने काही भाषणांना फाटा देण्यात आले, असे
सांगितले. या विषयावर खासदार राजन विचारे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आ.सौ. मंदाताई म्हात्रे यांची बाजू घेऊन महापालिकेचा कारभार मनमानी असल्याची प्रतिक्रिया देवून महापौर सुधाकर सोनवणे आणि आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यातील वाद अधिक पेटता ठेवण्याची राजकीय खेळी खेळली आहे.