नवी दिल्ली : देशात हजार रूपयांच्या नोटेपेक्षा पाचशे रूपयांच्या नोटेला अधिक मागणी असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. देशात पाचशे रूपयांच्या नोटेला पहिली पसंती असून एक हजार रूपयांच्या नोटेला दुसरी पसंती दिली जाते. एकूण चलनी नोटांचा वापरांपैकी ५०० रूपयांच्या नोटेच्या वापराचे प्रमाण ४६ टक्के आहे, अशी माहिती असोचॅम संघटनेच्या अहवालानुसार समोर आली आहे.
असोचॅमने रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीच्या मदतीने देशातील चलनी नोटांच्या वापराचा अभ्यास केला असून त्याचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार चलनी नोटांमध्ये १०० रूपयांच्या नोटेचा वापर १०.५% टक्के आहे. तर २० रूपयांच्या नोटांचा वापर एक टक्क्यांपेक्षा कमी असून ५० रूपयांच्या नोटेचा वापर १.२% आहे. दोन वर्षांपुर्वी (मार्च २०१३) वीस रूपयांच्या नोटांचा वापर ५.२% होता. आता हा वापर केवळ ०.६ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यावेळी ५० रूपयांच्या नोटांचा वापर ४.७ टक्के होता.
सध्या लोकांचे राहणीमान उंचावले आहे. त्यामुळे केवळ २० रूपयांत आवश्यक गोष्टी मिळणे अशक्य झाले आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपुर्वी कमी किंमतीच्या नोटांना प्रचंड मागणी होती, असे असोचॅमचे सरचिटणीस डीएस रावत यांनी सांगितले.
दुसरीकडे वीस रूपयांपेक्षा कमी पैशांच्या नोटांचा वापर अगदीच किरकोळ झाला असून त्यांची जागा नाण्यांनी घेतली आहे. सध्या पाच रूपयांच्या नाण्याला सर्वाधिक मागणी आहे. पाच रूपयांच्या नाण्याला ३३% मागणी असून दोन रूपयांच्या नाण्याला २७.८% मागणी असल्याचे समोर आले आहे.
सर्वसामान्य श्रमिक कुटुंबातील स्त्रियांना दररोज लागणार्या भाज्या, पीठ व तेलासारख्या मुलभूत खरेदीसाठी ५०० रूपयांची नोट घेऊन बाहेर पडावे लागते. परंतु मध्यमवर्गीय घरातील लोकांकडून कार्यालयातील चहा, कॉफीवरच ५०० रूपयांचा खर्च केला जातो. इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी मध्यमवर्गीय लोक १,००० रूपये खर्च करतात, असेही सांगण्यात आले आहे.