न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
पेस-हिंगीस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्स आणि सॅम क्यूरी या जोडीचे आव्हान ६-४, ३-६, १०-७ असे मोडीत काढत विजय मिळविला. चौथे मानांकन असलेल्या या जोडीची बेथानी मॅटेक आणि सॅम क्यूरी यांच्याबरोबरील लढत तीन सेटपर्यंत चालली. अखेर पेस-मार्टिनाने अनुभवाच्या जोरावर तिसरा सेट १०-७ असा जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
पेस-मार्टिना या जोडीने या वर्षभरातील ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिळविलेले हे तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी टेनिसच्या इतिहासात १९६९ मध्ये मार्टी रिसेन आणि मार्गारेट कोर्ट यांनी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली होती. त्यानंतर प्रथमच एखाद्या जोडीने वर्षात तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली आहेत. पेसने भारताच्याच महेश भूपतीच्या साथीने कारकिर्दीत सर्वाधिक ९ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेली आहेत.