संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : एका वेगळ्या लाटेवर राजकीय समीकरणे निर्माण झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणूकीत वेगळे चित्र पहावयास मिळाले. महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने अनेकजण रंगवू लागले. तथापि महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. कारण महापालिका ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणार्यांचे इरादे कार्यकर्त्यानी तोडले असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांनी केले.
रविवारी (दि. 13 सप्टेंबर) नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेरूळ तालुक्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात लोकनेते गणेश नाईक उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
इतिहासाकडे वळून पाहताना त्यात रमायचे नसते तर त्यातून बोध घ्यायचा असतो. वर्तमानात जागृत राहून भविष्याचा सतत वेध घ्यायचा असतो. मागे काय घडले यातील नामउमेद करणार्या गोष्टी बाजूला फेकल्या पाहिजेत. विधानसभा निवडणूकीत भाजपाचा उमेदवार 1400 मतांनी विजयी झाला. या निवडणूकीत शिवसेना-भाजपाच्या मतांची बेरीज 1 लाख 56 हजार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अवघे 52 हजार मतदान होते. तथापि महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला झालेले मतदान हे शिवसेना-भाजपापेक्षा काही हजारांनी अधिक आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास पराभवाला कारणीभूत ठरला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शकपणे चालला आहे. त्यामुळे आता पक्षवाढीची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांच्या माध्यमातून पक्षसंघटना नजीकच्या भविष्यात नव्याने आकार घेणार असून महापालिका व पक्षसंघटना यांच्यामध्ये युवा नेते व माजी महापौर सागर नाईक हे यापुढे समन्वयकाची भूमिका बजावणार असल्याचे व काही तालुकाध्यक्ष वाढविण्याची आपण सूचना केली असल्याचे लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाषणात सांगितले.
येत्या 2 ऑक्टोबरला वाशीतील भावे नाट्यगृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून तत्पूर्वी पालक, युवक, महिला, विद्यार्थी, युवती, वकील, डॉक्टर यासह सर्वच सेलच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. पक्षसंघटनेत बदल करताना नव्यांना संधी देण्यात आली असली तरी जुन्या लोकांना मार्गदर्शक म्हणून नजरेसमोर ठेवा, त्यांचा मानसन्मान कायम ठेवा. जुन्या महिला कार्यकर्त्यांनाही मान-सन्मानाची वागणूक मिळेल याकडे लक्ष ठेवा. पक्षसंघटनेची यापुढील रचना पिरामिडसारखी करण्यात येणार आहे. केवळ व्हिजिंग कार्ड मिरविण्यापुरते पदाचा वापर करू नका, अशा शब्दामध्ये लोकनेते गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.
जोपर्यत अंगावर कष्ट पडत नाहीत, तोपर्यत कार्यकर्त्यांना संघटनेची किमंत कळत नाही. कार्यकर्ते एकत्र आल्यावरच संघटना वाढते. यापुढे पक्षाच्या कार्यालयात सर्वच सेलच्या पदाधिकार्यांनी बसलेच पाहिजे, त्यांच्या एकत्रित बैठका झाल्याच पाहिजेत. नगरसेवक व वार्ड अध्यक्ष कार्यालयात दररोज 2 ते 3 तास बसलेच पाहिजेत. कार्यालयात आपली उपलब्धता असेल तरच आपण लोकांपर्यत पोहोचू शकतो. महापालिका व संघटना यात समन्वय करण्याच्या सूचना आपण सागर नाईक यांना केल्या आहेत. कॅलेडरनुसार नियोजन करण्याच्या त्यांना आपण सूचना केल्या असल्याचे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता आक्रमक झाले पाहिजे. परंतु महात्मा गांधींजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचाही आपण वापर केला पाहिजे. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकशाहीच्या मार्गांनेच यापुढे कार्यकर्ता आक्रमक झाला पाहिजे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी यापुढे लोकोपयोगी कार्यक्रम राबवावेत. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग न होण्यासाठी प्रयत्न करा. निवडणूकांपुरते कार्यरत राहू नका, तर सातत्याने जनसामान्यांत कार्यरत रहा, असे आवाहन लोकनेते गणेश नाईकांनी केले.
हिमालयासम उंचीचे नेतृत्व शरद पवारसाहेबांच्या रूपाने आपणास लाभले. काही दिवसापूर्वीच पक्षाच्या संगटनात्मक कामानिमित्त बिहारला गेलो असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंडळींना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेवणासाठी त्यांच्या बंगल्यावर बोलविले होते. त्यामध्ये माझाही समावेश होता. त्यावेळी भोजनसमयी आपली खुर्ची बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवारसाहेबांना दिली होती. ही ताकद आपल्या नेत्याची आहे. शरद पवार जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे भाग्य उजळले असते. आज सर्वच पक्ष दुबळे झाले आहेत. त्यांची शकले उडत आहेत. महाराष्ट्राच्या नजरा आज नवी मुंबईवर खिळल्या असल्याचे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
कल्याण-डोंबिवली निवडणूकीत प्रचारादरम्यान आपण सर्वांना स्थानिक भागाकरता आपण काय केले तेच जनतेला सांगा अशा सूचना केल्या आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मातब्बरांनी प्रचारात दगडखाणींची रॉयल्टी भरली नाही म्हणून महापालिकेकडे पैसा नाही. माझ्या घरच्या तिजोर्या भरल्या असे विविध आरोप करून चिखलफेक केली. पण दगडखाणींची रॉयल्टी कलेक्टरकडे भरायची असते, महापालिकेकडे नाही, हेही त्यांना समजत नाही. माझ्या घरात तिजोरीच नसल्याने ते कधीही सर्च वारंट काढून माझ्या घराची तपासणी करू शकतात. मुख्यमंत्री तर कधीही चौकशी करू शकतात. उलट त्यांनी सीबीआय चौकशी करून फास्ट ट्रॅकवर चौकशी चालवावी. 15 वर्षे मंत्री होेतो. त्या खात्याच्या फाईली आजही मंत्रालयातच आहेत. चौकशी करा, असे सांगत लोकनेते गणेश नाईकांनी विरोधकांना खुलेआमपणे आव्हान केले आहे.
प्रचारादरम्यान गणेश नाईकांना गाडण्याची भाषा वापरली गेली. पण गणेश नाईक गाडण्याच्या नाही तर आपला म्हणण्याचा माणूस असल्याची आजही शिवसैनिकांची भावना आहे. मी पक्ष सोडल्यावर कोणाही विरोधात आजपर्यत काहीही बोललो नाही. मुंबई-ठाणे-रायगडातील शिवसैनिकांमध्ये आजही गणेश नाईकांप्रती आपलेपणाची भावना आहे. हिंदूधर्मात गाडले जात नाही तर जाळले जाते याचीही मी त्यांना त्यावेळी आठवण करून दिली. कार्यकर्त्यातील संभ्रम दूर करण्याचे काम आपण वेळोवेळी केेले असल्याचे लोकनेेते गणेश नाईकांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये विनम्रता पाहिजे. कोणाप्रती द्वेष नसावा. द्वेष असला तर प्रगती होत नाही. दूरचित्रवाणीवरील मालिका पाहून फारसे साध्य होत नाही. त्या ठिकाणी कपट करायलाच शिकायला मिळते. अशा मालिका पाहण्यात वेळ न घालविता जनसामान्यांकरता वेळ घालवा. 24 तास समाजकारण करा. माणूसकीधर्माचे पालन करा. लोकांनी आपल्याला कितीही बदनाम करण्याचा प्रयास केला तरी आपल्यातील आत्मविश्वास कायम ठेवा. गणेश नाईकचा कार्यकर्ता ही तुमची ओळख निर्माण झाली तर लोक तुम्हाला समोरून मदत करतील. पराभव होतच असतात. पराभवाने हताश न होता नव्याने उभे रहा. समाजसेवा करा, येणारा काळ हा आपलाच असणार आहे असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा प्रयास लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाषणातून केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, महापालिका सभागृह नेते जयवंत सुतार, माजी उपमहापौर अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी मेळाव्यात भाषणे करताना कार्यकर्त्याना प्रोत्साहीत करण्याचे काम केलेे.
यावेळी माजी महापौर सागर नाईक, माजी जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, नेरूळ गावचे सरपंच के.एन.म्हात्रे, सारसोळेच्या कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांच्यासह महापालिकेतील अधिकांश आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकनेते गणेश नाईकांचा वाढदिवस यावेळी दोन दिवस अगोदरच साजरा करण्यात आला. नेरूळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश भगत यांनी यावेळी प्रास्तविकपर भाषण केले, तर गणेश रसाळ यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.