सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेना-भाजपाच्या उमेदवारांचा पूर्ण धुव्वा उडाला असून, या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीत सेना-भाजपाच्या हाती एकही संचालकाची जागा लागली नाही. काँग्रेसच्या पूर्वीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून निवडणूक झालेल्या 17 पैकी 16 संचालक काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर एक अपक्ष संचालक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शेतकरी, ग्रामपंचायती, व्यापारी, पणन प्रक्रिया, विविध कार्य सहकारी संस्था, आदी घटकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना कौल दिला आहे.
या बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी डी. के. चव्हाण यांच्या उपस्थितीत सहकार निबंधक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सुरुवातीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने एकतर्फी निकाल येत असल्याने आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
ग्रामपंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे तुकाराम साईल व संतोष राणे हे दोन उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. तुकाराम साईल यांना 1879 व संतोष राणे यांना 1929 मते मिळाली तर पराभूत झालेले शिवसेना-भाजप युतीचे गजानन प्रभू यांना 421, तर रघुनाथ रेडकर यांना 385 कमी मते मिळाली.
सहकार संस्था मतदारसंघांमधून काँग्रेसचे कृष्ण करलकर, जॅकी डिसोजा, राजन परब, प्रकाश राणे, अरविंद राणे, तुळशीदास राणे, अवधुत रेगे हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सात उमेदवार विजयी झाले. करलकर यांना 1549, डिसोजा यांना 1533, राजन परब 1537, प्रकाश राणे 1570, अवधूत रेगे 1543 अशी विजयी मते मिळाली.
तर सेना भाजपच्या पराभूत झालेल्या उमेदवार दीपक कदम यांना 307, सुधीर गवस 307, दिगंबर तावडे 314, प्रकाश पार्सेकर 295, प्रमोद राऊळ 306, रमाकांत 335, तर अपक्ष रमाकांत वायंगणकर 29, रविंद्र कसालकर 15 एवढी कमी मते पडल्याने या उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे.
सर्वसाधारण सहकार महिला राखीव मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुजाता देसाई व कल्पना बुडकुळे विजयी झाल्या. सुजाता देसाई यांना 1593 तर कल्पना बुडकुळे यांना 1473 मते मिळाली. तर सेना भाजप युतीच्या स्नेहा दळवी यांना 360 व अनिषा परब यांना 337 मते मिळाल्याने त्याचा दारूण पराभव झाला. एकूण 3815 मतांपैकी 52 मते अवैध ठरली आहेत.
सहकारी संस्था इतर मागास मतदारसंघातून काँग्रेसच्या स्नेहल पाताडे विजयी झाल्या. त्यांना 1622 मते पडली तर सेना भाजपाच्या धनंजय टेमकर यांना 66, राजेंद्र सुतार यांना 326 मते पडल्याने त्यांचा दारूण पराभव झाला. एकूण 2077 मतांपैकी अवैध मते 63 झाल्याने ती बाद ठरली.
प्रक्रिया व पणन या मतदारसंघातून काँग्रेसचे मनिष दळवी विजयी झाले. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मनीष दळवी विजयी झाले. त्याचे प्रतिस्पर्धी अनंत फोंडके यांना 27 मते पडल्याने त्याचे डिपॉझिट जप्त झाले. मनीष दळवी यांना 214 मते पडली आहेत. एकूण 242 मतापैकी केवळ मत बाद झाले.
हमाल नोकरी मतदारसंघात काँग्रेसचे सुशांत राऊळ यांना 4 मते मिळून पराभव पत्करावा लागला तर अपक्ष समीर परब यांना 21 मते पडून ते विजयी झाले आहेत. विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून काँग्रेसचे गंगाराम वरक हे 1484 मते घेत विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे शामसुंदर गवळी 546 मते मिळाल्याने त्याचा दारूण पराभव झाला.
*****
** हा निकाल म्हणजे नारायण राणेंच्या नेतृत्वाची गरज
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस बहुमत देत एकतर्फी विजय मिळवून दिला. त्यामुळे काँग्रेस नेते नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाची गरज सिंधुदुर्गला वाटत असल्याचे स्पष्ट झाले. शेतकर्यांवर सेना-भाजपा सरकारने जो अन्याय केला आहे. त्याची चीडही या निवडणुकीतून या सर्वच घटकांनी दाखवून दिल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.