सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. शहरी भागाच्या तुलनेत गावठाणात आजाराचे प्रमाण अधिक आहे. महापालिका प्रशासन तक्रारींचे निवारण करण्याऐवजी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने स्मार्ट सिटीची वाटचाल रोगी सिटीच्या दिशेने सुरू असल्याची झणझणीत टीका सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक नवीन गवते करत सभागृहात प्रशासनाच्या कामाची लक्तरेच काढत सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर दिला.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सभागृहात नगरसेवक नवीन गवते सभागृहात बोलत होते.
शहरात रोगराई वाढत असतानाही प्रशासन टेबलावर बसून ठेकेदारांना बिले देत आहे. कामाबाबत तक्रारी करूनही ठेकेदारांची बिले थांबवली जात नाही. माजलेल्या ठेकेदारांना प्रशासनाकडून पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. मच्छर संध्याकाळी येतात व धुरीकरण सकाळी केले जाते, हा अजब फॉर्म्यूला कोणा ज्ञानीने आणला तेच माहिती नाही. प्रशासन कोणाचे काही ऐकत नाही. मनमानी कारभार करत आहे. कामगारांकडे विचारणा केल्यावर ते सांगतात, की आम्हाला कमी कामगारांना हे काम करावे लागत आहे. प्रभागांची संख्या वाढविली जाते, मग कामगारांची संख्या का वाढवत नाहीत, गावठाणामध्ये बकालपणा वाढीस लागला आहे. केवळ मृत्यूचा दाखला बनविण्यासाठीच मनपाचे वॉर्ड ऑफिस बनविले आहे का, अशी घणाघाणी टिका नगरसेवक गवते यांनी आज महासभेत केली.
कामाबाबत आमच्या तक्रारी प्रशासन ऐकून घेत नाही. कामाची खातरजमा न करता ठेकेदारांची बिले तात्काळ दिली जातात, माझ्या परिसरात सर्व रोगाचे रूग्ण पहावयास मिळत आहे. पाणी तुंबले आहे, सर्वत्र अस्वच्छता आहे. नागरिक घेराव घालत आहेत. बीव्हीजीसारख्या ठेकेदारालाच कामे कशी मिळतात. त्याच त्या ठेकेेदारांना सतत तीच ती कामे मिळत आहे. ई-टेंडरिंग कशाला म्हणतात? ही मॅच फिक्सींग असल्याचा आरोप नगरसेवक गवते यांनी यावेळी केला.
झोपडपट्टी परिसराची अवस्था आज दयनीय आहे. सर्व शहराचाच एक्स रे काढला तर रोगी सिटीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचे पहावयास मिळेल. याला आपणच कारणीभूत आहोत. आपणाकडे एमआरआर, सिटी स्कॅन मशिन उपलब्ध नाही. पेंशटला पालिका रूग्णालयातून बाहेर उपचारासाठी पाठविले जात आहे.फोर्टीजला पाठविले जाते. डीवायपाटील हॉस्पिटलला पाठविले जाते, यातही मॅच फिक्सींग आहे का ? आपण हॉस्पिटल कशाला उघडले आहे? जनतेला याचा लाभ भेटत नसेल तर ही हॉस्पिटल बंद करा. प्रशासनाने खासगी रूग्णालय चालविण्याची सुपारी घेतली असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक गवते यांनी यावेळी केला.
वार्ड रचना होत आहे. लोकसंख्या वाढत आहे. मग यूएचपीची संख्या का वाढत नाही. लवकरात लवकर रूग्णांवर उपचार झाले पाहिजे. ऐरोलीतील रूग्णांवर महाजन रूग्णालयात लक्ष दिले जात नाही. ऐरोलीचे रूग्णालय का सुरू होत नाही. मागेही उद्घाटन झाले, आताही उद्घाटन झाले, पण हे हॉस्पिटल कार्यरत कधी होणार, डायालेसिसची मशिन आपणाकडे उपलब्ध नाही. खर्चाची आकडेवारी वाढत चालली आहे. मग मशिन का विकत घेत नाही. हॉस्पिटलची उद्घाटने करताना तिथे सर्व मशिन उपलब्ध करा. फवारणी व सफाई कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी नगरसेवक गवते यांनी केली.
*** महापौर जनतेची चेष्टा करत आहेत ***
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नवीन गवते महासभेदरम्यान सभागृहात पोटतिडकीने सभागृहात आपली भूमिका मांडत असताना महापौर सुधाकर सोनवणे हसताना दिसले. त्यावर नगरसेवक गवते यांनी नाराजी व्यक्त करत, महापौर साहेब, आपण या विषयावर हसत असाल तर विषयाचे गांभीर्य आपणास नाही. आपण नवी मुंबइरकर जनतेची चेष्टा करत असल्याचे नगरसेवक गवते यांनी यावेळी सांगितले.