सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : महापालिकेच्या कारभारात सर्वात मोठा विभाग हा आरोग्य विभाग आहे. सर्वाधिक कर्मचारी या विभागात काम करत आहेत. २००६सालापासून हा विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारीच नसल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग निराधार झाला असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महासभेच्या कामकाजादरम्यान केली.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सभागृहात नगरसेवक गिरीश म्हात्रे सभागृहात बोलत होते.
डॉ. पत्तीवार यांची अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती झाल्यापासून महापालिकेने वैद्यकीय आरोग्य अधिकारी नेमलेला नाही. प्रभारी नियुक्ती करून काम चालविले जात आहे. ९ वर्षे महापालिकेला आरोग्य अधिकारी मिळू नये ही खेदाची बाब आहे. या जागेवर सक्षम अधिकारी नेमल्यास आरोग्य विभागातील अधिकार्यांमधील बेबनाव कमी होईल असा आशावाद नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी यावेळी चर्चेदरम्यान व्यक्त केला.
महापालिका प्रशासन साथीचे रूग्ण कमी असल्याचे सांगत आहे. तथापि खासगी रूग्णालये व दवाखान्यात साथीच्या आजाराच्या रूग्णांची गर्दी दिसत आहे. याचा अर्थ खासगी दवाखाने, रूग्णालये आणि महापालिकेत समन्वय नसल्याचे दिसत आहे. डेंगू, मलेरियामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याने आजच्या खास महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. एचओडीना शनिवार-रविवार सुट्टी असते. नगरसेवक रूग्णालयात गेल्यावर कर्मचारी एचओडींना फोन करतात, एसएमएस करतात, व्हॉटस्अप करतात, तेव्हा कुठे प्रतिसाद मिळतो. नगरसेवकांना रूग्णालयात ही वागणूक तर सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती असेल अशी विचारणा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केली.
चर्चेदरम्यान प्रभागातील अरूणोदय सोसायटीमागील भुखंडावरील बकालपणा, भंगाराचे साम्राज्य, त्या ठिकाणी सापडलेल्या डेंग्यूच्या अळ्या या समस्येचा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी विस्तृतपणे ऊहापोह केला.