नवी मुंबई : नुकतेच दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या परिसरात ‘अनघा पी आर आणि इव्हेंट्सचे उमेश चौधरी आणि अनघा लाड यांचे तर्फे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनातील सर्व चित्रे हि पुणे, मुंबई आणि नागपूर येथील चित्रकारांनी २ दिवस आनंदवन, वरोरा येथे राहून काढलेली होती. या प्रदर्शनास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. शेखर नाईक, अनु कुलकर्णी, निलकांती पाटेकर, वैशाली ओक, राजेंद्र पासलकर, गायत्री तांबे देशपांडे, ज्योती सुटणे, अक्षय तिजारे, सुजाता धारप या चित्रकारांची पेंटिंग आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अक्षर बिल्डर्स, महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन, मोहन गुरुनानी, मोहन सामंत यांनी घेतली. या चित्रांच्या विक्रीतून येणारी अंदाजे ५ लाखांची मदत आनंदवनास दिली जाईल अशी माहिती निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रकार शेखर नाईक यांनी दिली.
प्रदर्शनाचे शेवटचे दिवशी बहुचर्चित ‘समुद्र’ या नाटकाच्या टीमकडून आनंदवनाच्या मदतीसाठी ‘समुद्र’ चा १११ वा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. निर्माते प्रसाद कांबळी, कलाकार चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी तसेच महत्वाचे म्हणजे या नाटकातील सर्व तंत्रज्ञ व मदतनीस यांनी काहीही मानधन न घेता या प्रयोगाची आलेली सर्व रक्कम यावेळी उपस्थित डॉक्टर विकास बाबा आमटे यांचे कडे आनंद्वनाच्या मदतीसाठी सुपूर्त केली. नवी मुंबई महानगर पालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी यावेळी डॉक्टर विकास बाबा आमटे यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार केला. ‘आपण आनंदवनात या’ असे डॉक्टर विकास बाबा आमटे यांनी प्रेक्षकांना आवाहन करुन प्रसाद कांबळी, कलाकर, चित्रकार आणि आयोजक यांचे आभार मानले. यावेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी आपले आनंद्वनाशी असलेले नाते सांगून मनोगत व्यक्त केले.
यावेळी आजची नवी मुंबईचे संपादक संजय सुर्वे, मराठी साहित्य, संस्कृती, व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन तर्फे के. के. म्हात्रे आणि आनंद पाटील, महारोगी सेवा समितीचे नरेंद्र मेस्त्री, अमरजा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.